![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/10/gst-380x214.png)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित 41 व्या जीएसटी परिषदेत (GST Council Meeting), राज्याच्या वतीने अर्थमंत्री नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) सहभागी झाले होते. त्यावेळी वस्तू व सेवाकरातील (GST) नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जुलै 2020 पर्यंत 22 हजार 534 कोटी रुपयांची थकबाकी येणे असून, ही रक्कम वेळेवर न मिळता अशीच वाढत गेल्यास दोन वर्षात 1 लाख कोटींवर जाईल, अशी भीती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केली. देशातील जवळपास सगळी राज्ये सध्या कोरोना संकटाशी लढत असल्याने केंद्राकडून अधिक निधी मिळालाच पाहिजे. केंद्राने महसुल गॅरन्टी घेतली असल्याने राज्यांना भरपाईचा निधी वेळेवर देणे ही केंद्राची जबाबदारी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
जीएसटीचा हिस्सा आणि थकबाकी राज्यांना वेळेत देणे, राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढणे ही जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली असल्याने ते कर्तव्य पार पाडण्यासाठी केंद्रानेच कमी व्याजदराने कर्ज घेऊन, राज्यांना निधी उपलब्ध करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जीएसटी परिषदेत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जीएसटीतील नुकसान भरपाईची रक्कम केंद्र सरकारकडून वेळेवर मिळत नाही, त्यामुळे सर्वच राज्यांसमोर आर्थिक संकट आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिषदेत आणखी काही सूचना केल्या. ते म्हणाले की, राज्यांना जीएसटी नुकसानीपोटी भरपाई देण्यासाठी सुरु केलेल्या सेसची कालमर्यादा पाच वर्षांसाठी म्हणजे येत्या 2022 वर्षापर्यंत आहे. ही कालमर्यादा वाढवून मिळावी. केंद्राकडून राज्यांना देय निधी वेळेत देण्यासाठी केंद्र सरकारनेच कर्ज घ्यावे आणि राज्यांना ती रक्कम द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. केंद्र सरकारकडून राज्यांना दिलेल्या रकमेची वसुली सेसची कालमर्यादा वाढवून करावी व संपूर्ण वसुली होईपर्यंत सेसचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
राज्यांच्या उत्पन्नाचा वस्तू व सेवाकर अर्थात जीएसटी हा मुख्य स्त्रोत असल्याने केंद्र सरकारने ‘जीएसटी’पोटी राज्यांना देय रक्कम व थकबाकी वेळेत द्यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्र्यांनी जीएसटी परिषदेत केली.