Gram Panchayat Election 2022: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा, 4 ऑगस्टला मतदान, 5 ऑगस्टला मतमोजणी
Gram Panchayat | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) राज्यातील 271 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक (Gram Panchayat Election 2022) कार्यक्रम जाहीर केला आहे. या ग्रामपंचायतींसाठी 4 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. तर 5 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील जवळपास 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका पार पडतील. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे एका बाजूला शिवसेनेतील बंडामुळे राज्यातील महाविकासाघाडी सरकार टिकणार की गडबडणार हा प्रश्न असल्याने राज्य पातळीवर राजकारण तापले आहे. दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गावपातळीवरही राजकारण तापणार आहे.

राज्य निवडणुक आयोगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन 1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3) मधील कलम 10 अ पोटकलम (4) मधील अधिकारांचा वापर करत राज्य निवडणूक आयोगानं 271 निवडणुका जाहीर केल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी लागणारी अचारसंघीता पाच जुलैपासून लागू होणार आहे. चार ऑगस्टला मतदान पार पडेल तर पाच ऑगस्टला मतमोजणी पार पडेल.  (हेही वाचा, Herwad Pattern: विधवा प्रथा बंदीसाठी 'हेरवाड पॅटर्न' राज्यभर राबवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ग्रामपंचायतींना अवाहन, जिल्हा प्रशासनालाही आदेश)

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 5 जुलै 2022 (मंगळवार ) निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होईल. 12 जुलै 2022 ते 19 जुलै 2022 या कालावधीत इच्छुकांना नामनिर्देशनपत्रे सादर करता येणार आहेत. ही नामनिर्देशनपत्रे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येतील. 20 जुलै 2022 रोजी अर्जाची छाननी होईल. छाननीत राहिलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत 22 जुलै 2022 पर्यंत असणार आहे. त्याच दिवशी (22 जुलै 2022) दुपारी तीन नतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह देणे आणि उमेदवारांची अंतमी यादी प्रसिद्ध केली जाईल.

प्रत्यक्ष मतदान 4 ऑगस्ट 2022 रोजी होईल. 5 ऑगस्ट 2022 रोजी मतमोजणी जाहीर होईल.

कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायचीच्या निवडणूका -

नाशिक - 40, धुळे - 52,जळगाव - 24, अहमदनगर - 15, पुणे - 19, सोलापूर - 25, सातारा - 10, सांगली - 1, औरंगाबाद 16, जालना - 28, बीड - 13, लातूर -9, उस्मनाबाद - 11, परभणी - 3, बुलढाणा - 5