Gram Panchayat Election 2020: राज्यभरातील शंभर, दोनशे नव्हे 1775 ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासक पाहणार;भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेचीही तशीच अवस्था
Gram Panchayat | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यावर असलेल्या कोरोना व्हायरस संकटाचा फटका अनेक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांना बसताना दिसतो आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे मुदत संपलेल्या अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक (Gram Panchayat Administrator) नेमन्याची वेळ निवडणूक आयोगावर आली आहे. राज्यभरातील शंभर, दोनशे नव्हे तर तब्बल 1775 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला आहे. परंतू, कोरोना व्हायरस संकटामुळे मुदत संपलेली असूनही ग्रामपंचायत निवडणूक घेता येत नाही. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्राम पंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात यावा अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला केली आहे. दरम्यान, भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेची मुदत संपल्याने तिथेही निवडणुका लागणे अपेक्षीत होते. मात्र, तिथेही प्रशासक नेमला जाणार आहे.

ग्रामपंचायतींना मुदतवाढ मिळाली नाही तर अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार आहेत. या आधी काही कारणाने ग्रामपंचायत निवडणूक होऊ शकली नाही. तर, संबंधित ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येत होती. मात्र, आता निवडणूक आयोगाने योग्य व्यक्तिची निवड ग्रापंचायत प्रशासक म्हणून करावी असे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे योग्य व्यक्ती म्हणजे नेमके काय किंवा कोण याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे सरकारच्या किंवा प्रशासनातील मर्जीतील व्यक्तीच प्रशासक म्हणून नेमली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (हेही वाचा, Gram Panchayat Election 2020: मुदत संपून निवडणूक लागणार की प्रशासक येणार? रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 500 ग्रामपंचायतींबाबत संभ्रमावस्था)

जिल्हा आणि मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या

जिल्ह्याचे नाव ग्रामपंचायतींची संख्या
अमरावती 524
यवतमाळ 461
गडचिरोली 290
 रत्नागिरी 500
 एकूण  1775

दरम्यान, येत्या 14 जुलै रोजी भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद कार्यकाळ संपत आहे. तसेच,दोन्ही जिल्ह्यातील एकूण 15 पंचायत समित्या यांची मुदतही 11 जुलै रोजी संपत आहे. निवडणुका लांबणीवर पडल्याने या ठिकाणीही प्रशासक नेमला जाणार आहे.