Bhagat Singh Koshyari | (Photo Credit : ANI)

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आपली वादग्रस्त विधाने करण्याची मालीका सुरुच ठेवली आहे. आजही (19 नोव्हेंबर) त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयीच वादग्रस्त विधान केले. त्यामुळे राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्यपालांनी म्हटले की, 'शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतो आहे. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील'. दरम्यान, राज्यपालांच्या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनीही तीव्र आक्षेप घेत, केंद्र सरकारने राज्यपाल कोश्यरी यांना तातडीने महाराष्ट्राबाहेर हाकलून लावावे, असे म्हटले आहे.

मराठवाडा विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मानद डि. लिट पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी आयोजित कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी बोलत होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुलपती म्हणून या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली होती. या वेळी बोलताना कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुलना थेट नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याशीच केली. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. (हेही वाचा, मुंबईबाबतच्या केलेल्या वक्तव्यावर राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांनी मागितली माफी, दिले 'हे' स्पष्टीकरण)

मंचावरुन बोलताना कोश्यारी म्हणाले की, आम्ही शाळेत असताना आम्हाला शाळेत तुमचा आदर्श कोणअसे विचारले जायचे. त्या वेळी आम्ही विद्यार्थी आम्हाला जे चांगले वाटत असत ते आम्ही सांगू. म्हणजे कोणाला सुभाष चंद्र, कोणाला नेहरु, कोणाला गांधीजी चांगले वाटत असत. ज्याला जी व्यक्ती चांगली वाटत असेल तो त्या व्यक्तीचे नाव घेत असत. आज तुम्हाला आदर्श शोधायचे असतील तर कोठे बाहेर जाण्याची मुळीच गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातच आपले आदर्श शोधू शकतात. जर तुम्हाल कोणी विचारले तुमचे हिरो कोण आहेत तर मला वाटते तुम्हाला ते इथेच मिळती. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असेही कोश्यारी म्हणाले.