Sanjay Raut On Governor:  राज्यपालांनी राजकीय कारणांनी सरकारची अडवणूक करु नये- संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. राज्यपाल या पदाला आणि त्या पदावरील व्यक्तीला काम करण्यासाठी घटनात्मक मर्यादा असतात. त्या पाळायच्या असतात. महाराष्ट्राच्या राज्यपालांनीही त्या पाळाव्यात. हवे तर भाजपशासीत राज्यांमधील राज्यपाल कशा पद्धतीने काम करतात हेही पाहावे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ते दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप महाविकासआघाडी सरकारने कालच केला होता. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही हा राज्यपालांबाब नाराजी व्यक्त केली आहे.

कोणत्याही राज्यातील राजभवन हे राज्य आणि राज्य सरकारला मदत करण्यासाठी असते. सरकारचे पाय खेचण्यासाठी नव्हे. तसे केले तर तुमचाच पाय गुंत्यात अडकून तुम्ही पडण्याचीच शक्यता अधिक असते, असा टोला लगावत संजय राऊत यांनी राज्यपालांवर हल्लाबोल केला. शिवाय राज्यपालांनी राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करणे म्हणजे तो एक राजकीय दबावाचाच प्रयत्न असतो, असेही राऊत या वेळी म्हणाले. (हेही वाचा, MVA Government on Governor: आपण मुख्यमंत्री नाही हे राज्यपालांनी समजून घ्यावे- महाविकासआघाडी सरकार)

संजय राऊत यांनी पुढे बोलताना म्हटले की, घटनेनुसार शपथ घेतलेल्या राज्य सरकारची राज्यपालांनी राजकीय कारणास्तव अडवणूक करु नये. मग तो एमपीएमसीसंबंधीत असलेल्या नियुक्त असो किंवा विधानपरिषद आमदारांच्या. त्यांना राज्य सरकारने केलेल्या शिफारशी टाळता येत नाहीत. त्यांना घटनात्मक नियमांनुसार निर्णय घ्यावेच लागतील. राज्यपालांनी कोणत्याही वादापासून दूर राहावे. वादात पडून नये. राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करण्यास राज्यपालांना कोणी भाग पाडते आहे का तेही पाहावं लागेल. राज्यपालांनी कोणाचे बोलवते धनी होऊ नये. मात्र, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल अशा प्रकारचे वर्तन करताना वारंवार दिसतात, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

ज्या ठिकाणी भाजपशासित राज्ये आहेत तिथले राज्यपाल राज्यभर दौरे काढताना दिसत नाहीत. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्येच असे होताना दिसते. भाजपशासीत इतर राज्यांमध्येही मोठे पूर आले परंतू, तिथले राज्यपाल गावोगावी दौरे काढताना अजिबात दिसत नाहीत. राज्यपालांनी अशा प्रकारचे दैरे काढणे हे घटनाविरोधी असल्याचेही राऊत यांनी या वेळी सांगितले.