Governor Bhagat Singh Koshyari's Birthday

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासाआघाडी सरकारने प्रथमच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (overnor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर तीव्र शब्दात हल्ला चढवला आहे. राज्यपालांनी आपण मुख्यमंत्री नाही आहोत, हे एकदा समजून घ्यावे. राज्यात एकाच वेळी दोन दोन सत्ताकेंद्र राबवू नयेत, असे महाविकासआघाडी सरकारने म्हटले आहे. राज्याचे अल्पसंख्यकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांवर हल्ला चढवला आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राज्यातील विविध जिल्ह्यांध्ये दौरे करुन आढावा बैठका घेत आहेत, यावरुन राज्य सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यानी हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. या दौऱ्यावरुनही तीव्र नाराजी व्यक्त करत नवाब मलिक म्हणाले, राज्यपाल त्यांचे घटनात्मक कार्य सोडून वारंवार राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करत आहेत. ते विविध जिल्ह्यांचा दौरा करुन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका घेत आहेत. हे राज्य मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आले आहे. राज्य मंत्रिमंडळाचा त्यास विरोध आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या माध्यमातून ही बाब राज्यपालांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे मलिक यांनी म्हटले आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे सध्या राज्यपाल आहेत. ते पूर्वी मुख्यमंत्री होते. त्यामळे आता त्यांनी आपली भूमिका समजून घ्यायला हवी. आपण मुख्यमंत्री नाही राज्यपाल आहोत, हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, असा टोलाही नवाब मलिक यांनी राज्यपाल कोश्यारी यांना लगावला. शिवाय, राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुकत 12 आमदारांची जी नावे सूचवली आहेत ती यादी राज्यपाल रद्द करु शकत नाहीत. त्यांना ती मंजूर करावी लागतात, असेही नवाब मलिक यांनी या वेळी सांगितले.