देश कोरोना विषाणूशी लढत असताना महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचे (Bird Flu) मोठे संकट आ वासून उभे राहिले आहे. या संकटामुळे अनेक कोंबड्या व इतर पक्षांना मारण्यात येत आहे. याचा परिणाम पोल्ट्री उद्योगावर होत आहे. राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून विविध टप्प्यांतील पक्ष्यांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी दिली. बर्ड फ्लू रेागाचा प्रादूर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाना, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष होकारार्थी आले आहेत.
बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या 1 किमी परिघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा करणे व रोग नियंत्रणाच्या ऑपरेशनल कॉस्ट अंतर्गत 1 कोटी 30 लाख रुपये मंजूर केले आहेत. यात प्रामुख्याने आठ आठवडे वयापर्यंत अंडी देणारे पक्षी रु. 20/- प्रति पक्षी, आठ आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी रु. 90/- प्रति पक्षी, सहा आठवडे वयापर्यंतचे मांसल कुक्कुट पक्षी रु. 20/- प्रति पक्षी, सहा आठवड्यावरील मांसल कुक्कुट पक्षी रु 70/- प्रति पक्षी, कुक्कुट पक्षांची अंडी रु. 3/- प्रति अंडे, कुक्कुट पक्षी खाद्य रु. 12/- प्रति किलोग्रॅम, सहा आठवडे वयापर्यंतचे बदक रू. 35/- प्रति पक्षी आणि सहा आठवड्यावरील बदक रु. 135/- प्रति पक्षी, अशा प्रकारे नुकसान भरपाई अदा केली जाणार आहे.
बर्ड फ्लूसाठी सोळा जिल्ह्यातील कुक्कुट पक्षी नमुने होकारार्थी आढळून आलेल्या, पोल्ट्री फार्मपासून 1 किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणाऱ्या सर्व कुक्कुट पक्ष्यांना, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. एकोणतीस ठिकाणांपैकी 25 ठिकाणी कुक्कुट पक्ष्यांना, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा नष्ट करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. (हेही वाचा: Bird Flu दरम्यान मांस व अंड्यांचे सेवन कितपत सुरक्षित आहे? FSSAI ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना)
दरम्यान, बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असे आवाहनही केदार यांनी केले आहे. तसेच राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणा-या पक्षांमध्ये मर्तूक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मर्तूक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्यामध्ये याची माहिती दयावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोलफ्री दुरध्वनी क्रमांक 18002330418 वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती दयावी, असेही सांगितले आहे.