खुशखबर! CIDCO कडून होळीची भेट; नवी मुंबईमध्ये 6,508 घरे विक्रीसाठी उपलब्ध, 'या' तारखेपर्यंत करू शकता अर्ज 
इमारत | प्रतिकात्मक फोटो |(Photo credit : commons.wikimedia)

होळीच्या शुभ मुहूर्तावर, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) ने नवी मुंबईमध्ये घर घेणाऱ्या लोकांसाठी भेट दिली आहे. सिडकोच्या सध्याच्या मेगा हाउसिंग स्कीम 2022 मध्ये सदनिकांच्या अतिरिक्त युनिट्सचा समावेश केला जाणार आहे. नियोजन संस्थेने सध्याच्या योजनेमध्ये अतिरिक्त 778 युनिट्स देऊ केल्या आहेत. अशाप्रकारे एकूण सदनिकांची संख्या 5730 वरून 6508 झाली आहे. जानेवारी 2022 मध्ये, सिडकोने 5730 सदनिकांसाठी मेगा हाउसिंग स्कीम 2022 लाँच केली होती, ज्यासाठी फॉर्म जमा करण्याची अंतिम तारीख 25 मार्चपर्यंत आहे.

होळीच्या शुभ मुहूर्तावर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात रंग भरण्यासाठी, सिडकोने सध्याच्या योजनेअंतर्गत एकूण 6,508 घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अधिकाधिक लोकांना नवी मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल, असा सिडकोचा दावा आहे. याच योजनेत नवी मुंबईतील द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, खारघर आणि तळोजा नोड्समधून अतिरिक्त युनिट जोडण्यात येणार आहे. परिणामी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) या योजनेअंतर्गत एकूण 1905 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

द्रोणागिरीमध्ये 181, घणसोलीमध्ये 12, कळंबोलीत 48, खारघरमध्ये 129 आणि तळोजामध्ये 1535 सदनिका उपलब्ध झाल्या आहेत. तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 4,603 सदनिका उपलब्ध असून त्यापैकी द्रोणागिरी येथे 241, कळंबोली येथे 22, खारघर येथे 88 आणि तळोजा येथे 4252 सदनिका आहेत. अशा प्रकारे एकूण 6,508 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: Nashik: तब्बल 15 लाख रुपये वीजबील भरुन मिळवली महावितरणच्या थकबाकीतून मुक्ती; प्रगतीशिल शेतकऱ्याची राज्यभर चर्चा)

गृहनिर्माण योजनेच्या इतर अटी व नियम तसेच राहतील आणि या योजनेशी संबंधित सर्व प्रक्रिया पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार पार पाडल्या जातील. या वाढीव सदनिकांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोने केले आहे.