ST Bus. (Photo Credits: PTI)

7th Pay Commission: शिंदे-फडणवीस सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) सहा टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. एमएसआरटीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe) यांनी पीटीआयला सांगितले की, सरकारने सध्याच्या महागाई भत्त्यात 28 टक्क्यांवरून 34 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे.

या दरवाढीमुळे सरकारी सार्वजनिक वाहतूक संस्थेवर दरमहा 15 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे. चार महिन्यांपासून हा निर्णय प्रलंबित असला तरी त्यांना या निर्णयामुळे आनंद झाल्याचे युनियनचे नेते श्रीरंग बर्गे (Shrirang Barge) यांनी सांगितले. MSRTC कर्मचार्‍यांनाही महागाई भत्त्याची थकबाकी मिळणे गरजेचे आहे. कारण पूर्वीच्या राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना ही थकबाकी दिलेली नाही. (हेही वाचा - Local Self Government Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर; पुढची सुनावणी 28 नोव्हेंबरला होण्याची शक्यता)

सध्या महामंडळाकडे 80,000 हून अधिक कर्मचारी आहेत. गेल्या वर्षी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासह विविध मागण्यांसाठी एमएसआरटीसी कर्मचारी पाच महिन्यांहून अधिक काळ संपावर गेले होते. MSRTC हे 16,000 हून अधिक बसेसच्या ताफ्यासह देशातील सर्वात मोठी सरकारी मालकीची सार्वजनिक वाहतूक आहे.