ग्लोबल टीचर पुरस्कार ((Global Teacher Prize 2020) प्राप्त केलेल्या रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः व्हॉट्सअॅप स्टेटस द्वारे याची माहिती दिली आहे. लक्षणे आढळल्याने मी कोविड चाचणी करुन घेतली असून रिपोर्ट पॉझिव्हिट आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसंच संपर्कात आलेल्यांना कोरोना टेस्ट करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार पुरस्कार मिळाल्याने सोलापूर मधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण रणजितसिंह डिसले प्रकाशझोतात आले होते. सर्वच स्तरातून कौतुक होत असलेल्या डिसले सरांनी अलिकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर रणजीत डिसले मुंबईत आले होते. नुकतेच ते त्यांच्या मूळ गावी बार्शीला परतले होते. त्यानंतर कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी चाचणी करुन घेतली. दरम्यान, त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असून घरातील इतर मंडळीची कोविड टेस्ट निगेटीव्ह आली आहे.
युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झाला. सात कोटींचा हा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी डिसले सरांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यानिमित्ताने प्रवास. अनेक मुलाखती, अनेकांच्या भेटीगाठी यातून डिसले सरांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. (रणजीत सिंह डिसले गुरुजींनी दाखवलेल्या दातृत्वामुळे महाराष्ट्राची मान जगात उंचावली- राज ठाकरे)
दरम्यान, डिसले सर पुरस्काराची 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांसोबत वाटून घेणार आहेत. शिक्षणव्यवस्थेतील प्रयोगशील आणि नाविण्यपूर्ण कामगिरीमुळे ओळखले जाणाऱ्या डिसले सरांचा हा निर्णय त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवतो. डिसले सरांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राची मान जगात उंचावली गेल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.