Girish Bapat | (Photo Credit - Facebook)

Political journey of Girish Bapat: भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन ( Girish Bapat Passes Away) झाले आहे. ते 75 वर्षांचे होते. गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. खास करुन भारतीय जनता पक्षाला बापट यांच्या जाण्याने मोठा फटका बसला आहे. गिरीश बापट यांची राजकीय कारकीर्द अत्यंत धडाडीची राहिली. आरएसएस स्वयंसेवक ते कामगार नेता, नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार अशा विविध पदांनुसार आलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अडचणीतही आले. परंतू, असे असले तरी पुण्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्राचे वेगळेपण कायम ठेवणाऱ्या नेत्यांच्या परंपरेत बापट यांचे नाव आदराने घेतले जाते. गिरीश बापट यांच्या जीवनावर टाकलेला हा अल्पसा कटाक्ष.

जनसंघाच्या माध्यमातून राजकारणात पाऊल

दांडगा लोकसंपर्क आणि सातत्याने जनतेत राहणारा कार्यकर्ता, नेता अशी गिरीष बापट यांची ओळख. बापट यांनी पुण्याच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेवला होता. प्रदीर्घ आजारामुळे रुग्णालयात उपचार घेत असतानाही त्यांनी आपले राजकीय वलय कायम ठेवले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून त्यांनी कार्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी जनसंघाच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवले. (हेही वाचा, Girish Bapat Dies: पुण्याचे भाजपा खासदार गिरीश बापट यांचे निधन)

सलग पाच वेळा आमदार

नगरसेवक पदासाठी केलेल्या उमेदवारीपासून गिरीश बापट यांच्या दखलपात्र राजकीय कारकीर्दीस सुरुवात झाली. पुढे त्यांनी नगरसेवक पदावरुन काम सुरु असतानाच 1995 मध्ये विधानसभेसाठी निवडणूक लढवली आणि जिंकली. 1995 मध्ये विधानसभा निवडणूक लढविल्यापासून गिरीश बापट सलगपणे निवडून येत राहिले. विधानसभेवर ते सलग पाच वेळा आमदार म्हमून निवडून आले.

Girish Bapat | (Photo Credit - Facebook)

खासदारकीची पहिलीच टर्म

लोकसभा निवडणकू 2019 मध्ये त्यांना पक्षाने लोकसभेसाठी तिकीट दिले. या निवडणुकीत गिरीश बापट काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यांचा पराभव करुन विजयी झाले. ते लोकसभेचे विद्यमान खासदार होते. खासदार म्हणून ही त्यांची पहिलीच टर्म होती.

Girish Bapat | (Photo Credit - Facebook)

राजकारणापूर्वी टेल्को कंपनीत कामगार

तळेगाव दाभाडे येथून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या गिरीश बापट यांचा जन्म पुणे येथे 3 सप्टेंबर 1950 रोजी झाला. त्यांनी पुढील शिक्षण रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कूल येथे घेतले. तर बीएमसीसीमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी टेल्को कंपनीत कामगार म्हणून नोकरी सुरु केली. दरम्यान, इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात त्यांनी आंदोलनात भाग घेतला. परिणामी त्यांना 19 महिन्यांचा कारवास भोगावा लागला. त्यांना नाशिक येथील तुरुंगात पाठविण्यात आले होते.

Girish Bapat Dies | Twitter

टेल्को कंपनीत काम करत असताना गिरीश बापट यांनी कामगार नेता म्हणून कामगारांचेही नेतृत्व केले. दरम्यान, आणिबाणीतील तुरुंगवास भोगून आल्यावर बापट यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला जनसंख आणि आरएसएसशी संबंधित संस्थांवर त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. दरम्यानच त्यांनी 1983 मध्ये प्रथमच नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली आणि नंतर कधीही मागे वळून पाहिले नाही.