15 people Dead During Visarjan 2019 (Photo Credits: PIxabay)

मुंबई (Mumbai), कोकण (Konkan), विदर्भ (Vidarbh) व राज्यात ठिकठिकाणी आज (12 सप्टेंबर रोजी गणेशाच्या मूर्तीचा विसर्जन (Ganpati Visarjan) सोहळा थाटामाटात पार पडला. दहा दिवस भक्तांसोबत राहून उत्साहपूर्ण वातावरणात पाहुणचार घेतल्यावर आज बाप्पा पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी रवाना झाले, या क्षणी अश्रू भरल्या डोळ्यांनी भाविकांनी बाप्पाला निरोप दिला. पण या भावनिक वातावरणाला गालबोट लागेल अशी माहिती सध्या समोर येत आहे. कोकणासह विदर्भ व राज्यातील काही भागात विसर्जनावेळी पाण्यात बुडून 15 जणांचा बळी गेला आहे.

वास्तविक मागील काही दिवसात झालेल्या तुफान पावसानानंतर सर्वत्र नदीपात्र व पाण्याची ठिकाणे दुथडी भरून वाहत होती मात्र तरीही काही अतिउत्साही भाविकांनी पोहता येत नसताना निष्काळजीने पाण्यात उड्या घेतल्या आणि त्यातच त्यांचा अंत झाला. यापैकी सर्वाधिक मृतांची संख्या विदर्भात असून कोकणातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, विदर्भात अमरावती येथे भातकुली तालुक्यात चार जणांचा मृत्यू झाला, पोहता येत नसूनही या चौघांनी पाण्यात उडी घेतली मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला, यानंतर पोलीस त्यांच्या मृतदेहाचा अद्याप शोध घेत आहेत. तर वर्धा येथे कारंजा तालुक्यात विहिरीत विसर्जन करताना एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. भंडारा तालुक्यात सुद्धा विसर्जन करतेवेळी नदीच्या पात्रातील पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की यात एक  इसम वाहून गेला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला.

दुसरीकडे कोकणातही अशाच प्रकारे 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. कुठे पाण्याचा वेग तर कुठे नदीपात्राची खोली न जाणवल्याने सिंधुदुर्ग येथे 2 व रत्नागिरीमध्ये 3 जणांचा बुडून मृत्यू झाला. याशिवाय श्रीरामपूर येथे एका 18 वर्षीय तरुणाचा मृतदेह अजूनही बेपत्ता आहे. कराड येथे आगाशिव नगर येथून मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी पाण्यात उतरलेला एक तरुणही कोयना नदीत वाहून गेला आहे. शहापूर येथे तर एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलाचा नदीपात्रात तोल जाऊन मृत्यू झाल्याचे समजत आहे. तसेच नांदेड मध्ये 21 वर्षीय तरुणाचा खदानीत बुडून एका भाविकांचा मृत्यू झाला.

दरम्यान, विसर्जनाच्या वेळी भाविकांचा उत्साह आणि खबरदारीचा अभाव हे या सर्वच घटनांमधील प्रमुख कारण म्हणून समोर आले आहे. यापूर्वीही दहीहंडीच्या वेळी राज्यात अशाच प्रकारे अनेकांचा मृत्यू झाला आहे. या अतिउत्साहामुळे एकाअर्थी सणांना सुद्धा गालबोट लागत आहे.