Eco-friendly Ganesha Idols (संग्रहित संपादित प्रतिमा)

या वर्षीपासून गणेशोत्सवामध्ये (Ganeshotsav 2023) घरात पर्यावरण पूरकच मूर्तींची (Environment-Friendly Lord Ganesh Idols) स्थापना होण्याबाबत बीएमसी (BMC) प्रयत्नशील आहे. काल सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई तसेच कोकणातील मूर्तिकार, सार्वजनिक गणेश मंडळे यांची बैठक पार पडली. यावेळी, पर्यावरणपूरक उत्सव ही आता काळाची गरज आहे. लोकांमध्ये देखील यासंदर्भात मोठी जागृती निर्माण होत आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीतील प्रदूषणकारी घटक कमी करणे अथवा इतर काही पर्याय उपलब्ध करण्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची घोषणा केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, आज बीएमसीने जाहीर केले आहे की, या वर्षापासून घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अनिवार्य असतील. तसेच, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे शुल्क आणि ठेवी माफ करण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मागील वर्षांतील ठेवीही येत्या 7 दिवसांत परत केल्या जाणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल तसेच इतर मनपा आयुक्तांना मातीच्या मूर्तीकारांना कुठलाही अडथळा येऊ न देता सुलभपणे जागा उपलब्ध करून द्यावी तसेच परवानग्या वगैरे करीता अनेक ठिकाणी धावपळ करण्याची गरज त्यांना भासू नये, यासाठी एक खिडकी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. गेल्या वर्षी मंडप शुल्क माफ करण्यात आले होते, मात्र त्यापूर्वी जे शुल्क आकारले गेले ते मंडळांना परत करण्याचीही कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (हेही वाचा: SC Allowing Bull-Cart Racing: 'घाटात होणार राडा', सर्वोच्च न्यायालयाकडून 'बैलगाडा शर्यत' आणि Jallikattu खेळास परवानगी कायम)

मुख्यमंत्री म्हणाले होते की, पर्यावरणपूरक गणेशोत्सव व इतर उत्सव साजरे झाले पाहिजेत यावर राष्ट्रीय हरित लवाद, सर्वोच्च न्यायालय यांनी निर्देश दिले आहेत. आपण टप्प्याटप्प्याने याकडे वाटचाल करतो आहोत. कृत्रिम तलावात घरगुती गणेश विसर्जन करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. लोकांचा यासाठी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मातीच्या मूर्ती, कागदी लगदा वापरून मूर्ती, किंवा पेंढा वापरून देखील मूर्ती मोठ्या प्रमाणावर तयार होत असून लोक देखील अशा मूर्तींना पसंती देत आहेत. पर्यावरणाचा समतोल ठेवला गेला पाहिजे. सण आणि उत्सव साजरे करायचे पण निसर्गाची तोडफोड नको हे तत्व आपण ठेवले पाहिजे.