Mumbai-Goa Highway Representative Image (Photo Credits: PTI)

गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, तसेच त्या मार्गावर ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी गृह (परिवहन) विभागाने अशा वाहनांना या मार्गावर प्रतिबंध केला आहे. त्या संदर्भातील आदेश 23 ऑगस्ट, 2022 रोजी जारी करण्यात आले आहेत. 27 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते 10 सप्टेंबर रोजीच्या रात्री आठ वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर वाळू/रेती व तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंदी राहणार आहे.

वरील निर्बंधबंदी दूध, पेट्रोल/डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रस्ता रुंदीकरण /रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य, माल इ. ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे गणेश चतुर्थी निमित्ताने कोकणवासीयांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात येते.  राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरुन जड वाहने व रेतीची वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहतूकीमुळे या कालावधीत कोकणाकडे ये-जा करणा-या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून वाहनांची कोंडी होऊन प्रवाशांची गैरसोय होते, त्यामुळे गृह (परिवहन) विभागाने मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 115 मधील तरतूदीचा वापर करुन सार्वजनिक हितास्तव पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 (रा.म.क्र.जुना क्र.17) (पनवेल ते सिंधुदूर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठाणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी) वरुन होणारी वाळू/रेती भरलेल्या ट्रकची, मोठ्या ट्रेलर्सच्या तसेच अवजड वाहनांच्या वाहतूकीस प्रतिबंध केला आहे. त्याबाबतचे आदेश विभागाने जारी केले आहेत.

या आदेशानुसार,  गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रवास/ मूर्तीचे आगमन लक्षात घेता, 27-08-2022 ते 31-08-2022 कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) अशा वाहनांना वाहतुकीसाठी बंदी असेल. (हेही वाचा: Ganeshotsav 2022: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा दिलासा; रस्त्यांच्या दुरस्तीची कामे 25 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश)

अनंत चतुर्दशी 10 दिवसांचे गणपती विसर्जन/परतीचा प्रवास (09-9-2022 ते 10-09-2022 या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) वाहतुकीस पूर्णत: बंद असेल. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग/महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र द्यावे तसेच जे.एन.पी.टी. बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक सुरळीत राहील याकरीता वाहतुकीचे नियोजन करण्यात यावे असे या आदेशात म्हटले आहे.