G-20 Conference: जी-20 परिषदेच्या शिष्टमंडळाचे मुंबईमध्ये जंगी स्वागत; सदस्यांनी घेतला हेरिटेज वॉक, मराठी खाद्यपदार्थ, बासरीवादनासह ध्वनी आणि प्रकाश शोचा आनंद (Watch)
जी-20 परिषद शिष्टमंडळ (संग्रहित संपादित प्रतिमा)

जी-२० परिषदेच्या आपत्ती जोखीम सौम्यीकरण कार्यगटाची बैठक मुंबईत दिनांक २३ ते २५ मे २०२३ या कालावधीत होत आहे. या बैठकीसाठी आलेल्या शिष्टमंडळाने (G20 Delegates) आज (दिनांक २३ मे २०२३) बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. महानगरपालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालय इमारतीचे पुरातन वारसा दर्शन अर्थात हेरिटेज वॉक करण्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाचाही अभ्यास दौरा या शिष्टमंडळाने केला. मुख्यालयाची भव्यदिव्य व नेत्रदीपक वास्तूरचना पाहून शिष्टमंडळातील सदस्य भारावून गेले. तर, विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांच्या वेळी करावयाचे प्रतिबंध, उपशमन आदींबाबतची महानगरपालिकेची सज्जता पाहून शिष्टमंडळाने कौतुक केले.

जी-२० देशांच्या गटांच्या अध्यक्षपदाचा बहुमान यंदा भारताला मिळाला आहे. त्याचा एक भाग म्हणून देशातील विविध शहरांमध्ये निरनिराळ्या विषयांवर जी-२० देशांच्या कार्यगटांच्या बैठका होत आहेत. त्यातील ‘आपत्ती जोखीम सौम्यीकरण’ कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत आजपासून सुरू झाली आहे. सुमारे १२० पेक्षा अधिक प्रतिनिधी त्यात सहभागी आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने त्यांचे लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला जी-२० सदस्यांनी भेट दिली. त्यावेळी निरनिराळ्या आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून प्रतिबंध, उपशमन आणि सज्जतेसाठी केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपाययोजना, मुंबईवर आजवर आलेल्या विविध नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांवेळी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने केलेली कामगिरी, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची सुसज्जता, जनसहभाग वाढविण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न आदींसंदर्भात विस्तृत माहिती शिष्टमंडळासमोर लघूचित्रफित तसेच कॉफी टेबल बुक यांच्या रुपाने देखील सादर करण्यात आली. (हेही वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 26 मे रोजी नाशिकमध्ये होणार समृद्धी द्रुतगती मार्गाच्या शिर्डी-भारवीर भागाचे उद्घाटन)

त्यानंतर शिष्टमंडळाने गटागटाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूचा ‘हेरिटेज वॉक’ केला. मुख्यालय इमारतीची ऐतिहासिक माहिती, बांधकाम, वास्तूरचना, इतिहास आदींबाबत इत्थंभूत माहिती या सदस्यांना देण्यात आली. त्यानंतर मुंबईतील लोकप्रिय रुचकर खाद्यपदार्थांचा पाहुण्यांनी आस्वाद घेतला. पाणीपुरी, भेळ, मुंबई चाट, समोसा, वडापाव, पावभाजी, मुंबईचा मसाला चहा इत्यादी खाद्यपदार्थांचा आणि पेयांचा यामध्ये समावेश होता. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कोर्टयार्ड परिसरात पाहुण्यांसाठी खास बासरीवादन ठेवण्यात आले होते. पंडित भुपेंद्र बेलबन्सी यावेळी बासरीवर यमन राग वाजवत असताना पाहुणे त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी या रागाचा आनंद घेतला. त्यानंतर प्रतिनिधींनी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे डिजिटल साउंड आणि लाइट शोचा कार्यक्रमही अनुभवला.