अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज होणार जाहीर
Representational Image (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल लागल्यावर 19 जून पासून मुंबईत अकरावी प्रवेश प्रक्रियेला (11th Online admission) सुरुवात झाली. त्यानंतर आज संध्याकाळी 6 वाजता प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यादी जाहीर झाल्यानंतर यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय ज्या विद्यार्थ्यांना मिळाले आहे त्यांनी 13-15 जुलैपर्यंत महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे.

पहिल्या गुणवत्ता यादीत मुंबई विभागातून 1 लाख 85 हजार 473 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यंदा 1 लाख 85 हजार 473 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी अर्ज केला होता. त्यापैकी 1 लाख 17 हजार 275 विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला पसंती दिली आहे. ही संख्या सर्वाधिक आहे. तर त्यानंतर 49 हजार 543 विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि 17 हजार 301 विद्यार्थ्यांनी कला शाखेसाठी अर्ज केला आहे.

अकरावी प्रवेशाच्या खुल्या वर्गाशिवाय इनहाउस, मॅनेजमेंट, अल्पसंख्याक अशा कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या जागाही आज जाहीर होणार आहेत. (अकारावी प्रवेश प्रक्रियेत SSC च्या विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी विज्ञान, कला, वाणिज्य शाखेच्या जागा वाढल्या; शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांची माहिती)

निकालानंतर पालक व विद्यार्थ्यांना कॉलेज प्रवेशाची चिंता असते. मात्र पहिल्या यादीनंतर अनेक विद्यार्थी-पालकांची काळजी मिटणार आहे.