यंदा झालेल्या महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत अंतर्गत गुण ग्राह्य न धरल्याने दहावीचा निकाल घसरला. विद्यार्थ्यांच्या कमी झालेल्या टक्केवारीमुळे अकारावीत प्रवेश घेताना सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांपुढं महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, अशी मागणी विद्यार्थी व पालक करत होते. त्यामुळे एसएससीच्या विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी अकरावी प्रवेशात विज्ञान, कला व वाणिज्य शाखेच्या जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. राज्याचे नवे शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली.
या निर्णयानुसार, अकरावी प्रवेशात विज्ञान शाखेच्या जागांमध्ये 5%, कला व वाणिज्य शाखेच्या जागांमध्ये 8% वाढ करण्यात आली आहे. पुणे, नागपूर विभागासाठी जागांच्या संख्येतील ही वाढ 10% असेल, असं शेलार यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर पुणे, नागपूर येथील निवडक महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी चर्चा करून या शहरातील ऑनलाईन प्रवेशांसाठी महाविद्यालयांमध्ये जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर मुंबईतील निवडक महाविद्यालयांमध्येही जागा वाढवण्या बाबत निर्णय घेण्यात आला आहे. (महाराष्ट्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना त्रास न देता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार: आशिष शेलार यांची विधीमंडळात माहिती)
यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र तुकडी निर्माण करण्याची मागणी युवासेनेचे आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय सरकारनं घेतला आहे. विशेष म्हणजे अकरावीच्या प्रवेशाबाबत कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल, असेही सरकारने स्पष्ट केले असून राज्यातील एकही विद्यार्थी, विद्यार्थिनी अकरावी प्रवेशापासून वंचित राहणार नसल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.