Bitcoin Scam: रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, बीटकॉईन घोटाळ्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनकडून दोघांना अटक
Rashmi Shukla | (File Photo)

महाराष्ट्राच्या पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बीटकॉईन घोटाळ्याप्रकरणी (Bitcoin Scam) पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) दोघांना अटक केली आहे. या दोघांपैकी एक पुण्यातील निवृत्त आयपीएस अधिकारी आहे. स्वत:ची कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी पोलिस सेवेतून निवृत्ती घेतली. रश्मी शुक्ला पोलिस आयुक्त असताना, डिजिटल सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये पुणे पोलिसांना तांत्रिक मदत करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी बीटकॉइन घोटाळ्यातील काही रक्कम स्वतःच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली होती. म्हणजे, सोप्या शब्दात सांगायचे तर, रश्मी शुक्ला पुणे पोलिस आयुक्तपदावर असताना बीटकॉइन क्रिप्टोकरन्सीशी संबंधित प्रकरणांमध्ये ज्यांच्याकडून तांत्रिक सल्ला घेण्यात आला अशा दोन सायबर तज्ज्ञांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी एक आयपीएस अधिकारी आहे.

दोघांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

तपास आणि तांत्रिक सल्ल्याच्या नावाखाली या दोघांनी 2018 मध्ये उघडकीस आलेल्या बीटकॉईन घोटाळ्याचे पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करून नंतर त्यांच्या साथीदारांच्या खात्यात पाठवले, असा आरोप पुणे सायबर पोलिसांनी दोघांवर केला आहे. यापैकी एक नाव सायबर तज्ज्ञ पंकज प्रकाश घोडे आणि दुसरे निवृत्त आयपीएस अधिकारी रवींद्र प्रभाकर पाटील आहे. या दोघांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

2018चा बीटकॉइन घोटाळा

बीटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 2018 मध्ये पुण्यात अनेकांची फसवणूक झाली होती. रश्मी शुक्ला त्या वेळी पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या. याप्रकरणी पुये येथील दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासात मदत करण्यासाठी पुणे पोलिसांनी त्यावेळी ‘ग्लोबल ब्लॉकचेन फाऊंडेशन’ या कंपनीची मदत घेतली होती. ही कंपनी या दोन आरोपींची आहे. (हे ही वाचा Anil Deshmukh Case Update: अनिल देशमुख प्रकरणात परमबीर सिंह यांना धमकावल्याचा आरोप, CBIने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची केली 6 तास चौकशी)

या दोन्ही आरोपींनी तपासाच्या नावाखाली त्यांच्याकडे आलेल्या डेटाचा वापर करून बीटकॉईन प्रकरणातील आरोपींच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिप्टो एक्सचेंजच्या पाकीटातून क्रिप्टो चलन त्यांच्या खात्यात हस्तांतरित केले आणि नंतर ते त्यांच्या जवळच्या खात्यात हस्तांतरित केले.