डॉ. मधू पाटील (PC - Twitter)

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Former chief minister Vasantdada Patil) यांची नात डॉ. मधू प्रकाश पाटील (Madhu Patil) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. डॉ. मधू पाटील या काँग्रेसचे खासदार स्व. प्रकाशबापू पाटील आणि काँग्रेसच्या नेत्या श्रीमती शैलजा पाटील यांच्या कन्या होत्या.

मधू पाटील यांच्या पार्थिवावर आज शनिवारी पद्माळे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास पुणे येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Honor Killing at Chopda: जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात ऑनर किलिंगचा प्रकार उघडकीस; प्रेमी युगलांची निघृण हत्या)

डॉ. मधू पाटील यांच्यावर वसंतदादा पाटील यांचा खूप जीव होता. ते त्यांना प्रेमाने चिमुताई म्हणत असतं. मधू यांच्यावर लहानपणी इंग्लंडमध्ये दोन वेळा हृदय शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर आणखी एकदा त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु, तरीही त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतले होते.

दरम्यान, मधू पाटील यांनी सांगलीत नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. यावेळी त्यांनी सर्वसामान्य जनतेची वैद्यकीय सेवा केली. मधू यांनी राज्यात बोगस डॉक्टरांचा सुटसुळाट आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची होणारी फसवणूक यावर काम केले.