नर्गिस अंतुले यांचे निधन (Nargis Antulay Passes Away) झाले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले (AR Antulay) यांच्या त्या पत्नी होत्या. बॅरिस्टर अंतुले यांच्या आयुष्यात जीवनसाथी म्हणून नर्गिस यांची अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची भूमिका राहिली. त्यांच्या निधनाचे वृत्त राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून दु:ख व्यक्त केले जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. श्रीयुत अंतुले यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. त्यानंतर आता त्यांच्या पत्नीचेही निधन झाले आहे.
राज्यातील मंत्री अदिती तटकरे यांनी नर्सिगस अंतुले यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया मंज एक्सवर दु:ख व्यक्त करताना अदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, 'कोकणचे विकासक, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे दुःखद निधन झाले. अंतुले साहेबांच्या जीवनात नर्गिस भाभी यांनी त्यांना भक्कम साथ दिली. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहसंवेदना व्यक्त करते. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना'. (हेही वाचा, रायगड: बॅ. ए. अर. अंतुले यांचे चिरंजीव नविद अंतुले यांचा शिवसेनेत प्रवेश; सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढल्या)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आणि अदिती तटकरे यांचे वडील सुनील तटकरे यांनीदेखील नर्गिस अंतुले यांच्या निधाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडिया मंच एक्सवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमध्ये तटकरे यांनी म्हटले आहे की, 'राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. नर्गिस भाभी यांनी नेहमीच स्व. अंतुले साहेबांना मोलाची साथ दिली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!'
दरम्यान, बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून असलेली कारकीर्द अत्यंत वेगवान राहिली. अनेक निर्णयांमुळे ते चर्चेत आले. त्यातील काही निर्णय अत्यंत वादग्रस्त ठरले. खास करुन शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारांना भत्ता, पोलिसांच्या गणवेशात बदल करुन त्यांना फूलपॅण्ट असलेला गणवेश देणे असे काही महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. तत्काली कुलाबा जिल्ह्याचे रायगड असे नामकरण करण्याचा निर्णयही अंतुले यांनीच घेतला आणि त्यांच्याच कार्यकाळात त्याची अंमलबजावणीही झाली. सिमेंट घोटाळ्यामध्ये नाव आले आणि अंतुले यांना पदावरुन राजीनामा देत पायउतार व्हावे लागले. त्यानंतर पुढचे काही वर्षे ते लोकसभेत खासदार राहिले. त्यांच्या प्रत्येक निर्णय आणि भूमिकेमध्ये त्यांच्या पत्नी नर्गिस ठामपणे पाठीशी राहिल्या.