पोलिसांनी माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) आणि इतरांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायालयाबाहेर जमणे, कोविड-19 नियमांचे उल्लंघन करणे आणि सार्वजनिक सेवकाला त्याचे कर्तव्य बजावण्यात अडथळा आणल्याबद्दल हा एफआयआर दाखल केल्याचे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. एका प्रकरणात राज्याचे भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता, त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा निलेश राणे आणि इतर काही लोक मंगळवारी न्यायालयाजवळ जमले होते. न्यायालयाजवळ निलेश राणे आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता.
ओरस पोलिस ठाण्यात मंगळवारी संध्याकाळी माजी खासदार आणि इतरांविरुद्ध आयपीसी कलम 186 (कोणत्याही सार्वजनिक सेवकाच्या कामात स्वेच्छेने अडथळा आणणे), 188 (लोकसेवकाने योग्यरित्या जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे) तसेच 269 आणि 270 (जीवासाठी धोकादायक रोगाचा संसर्ग पसरण्याची शक्यता घातक कृत्य) आणि आपत्ती व्यवस्थापन कायदाअंतर्गत एफआयआर नोंदवला. (हेही वाचा: Nitesh Rane Surrender: शरण आल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी)
दुसरीकडे नितेश राणे यांच्यावर सिंधुदुर्गात हत्येचा प्रयत्न केल्याचा खटला चालू आहे. न्यायालयाने मंगळवारी नितेश यांचा जामीन नाकारला. त्यानंतर त्यांनी जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आपल्या याचिकेमध्ये त्यांनी दावा केला की त्यांना या प्रकरणामध्ये गोवण्यात आले आहे आणि हे त्यांच्या आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध ‘राजकीय सूड’ उगवण्याचे प्रकरण आहे.
आता माहिती मिळत आहे की, नितेश राणे आपली याचिका मागे घेत न्यायालयाला शरण गेले आहेत. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीवेळी 18 डिसेंबर रोजी महाविकासआघाडीचे प्रचारप्रमुख शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर हल्ल्याचा आरोप आहे. आतापर्यंत या प्रकरणात हल्ला करणारा प्रमुख आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलीसांनी दिल्ली येथून अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने नितेश राणे यांचे नाव घेतले.