महाराष्ट्रातील एक मोठे उद्योजक, साखर कारखानदार आणि लोकप्रिय दिग्दर्शक विजय गुट्टे (Vijay Gutte) यांचे वडील रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांनी, तब्बल 5 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुट्टे यांच्या मुंबई, परभणी आणि नागपूर स्थित 9 ठिकाणांवर गुरुवारी ईडीने (ED) छापे टाकले आहेत. ही कारवाई 6 बँकांकडून घेतलेल्या 328 कोटी रुपयांचा फसवणूकीमुळे केली गेली आहे. गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर खोटी कर्जे घेतली होती. महत्वाचे म्हणजे यातील अनेक शेतकरी आधीच मृत झाले आहेत.
ईडीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर्स कारखान्याने (GSEPL) हार्वेस्ट अॅण्ड ट्रान्स्पोर्ट या योजनेखाली 2015 साली 600 शेतकऱ्यांच्या नावे कर्जे घेतली होती. यासाठी आंध्र बँक, यूको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, रत्नाकर बँक यांनी त्यांना मदत केली. ज्या शेतकऱ्यांचे नावे कर्जे घेतली गेली त्यातील काही शेतकरी मृत होते, तर काही शेतकऱ्यांचे सध्याचे अस्तिवच माहीत नव्हते. तर यातील उर्वरीत अनेक शेतकरी रत्नाकर यांच्याच साखर कारखान्यात काम करतात. (हेही वाचा: परत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज)
मिळालेली ही रक्कम विविध खोट्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी करण्यात आली. यातील काही रक्कम मुद्दाम मृत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्येही भरण्यात आली होती. त्यानंतर एकाच दिवसात ही रक्कम जीएसईपीएलच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केली गेली. या खोट्या कर्जाचा मुद्दा विधानसभेत विपक्ष नेता धनंजय मुंडे यांनी उठावला होता.
धनंजय यांच्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी गुट्टे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी सांगितले होते की, हे सर्व 328 कोटी कर्ज शेतकऱ्यांचे आहे, एक खास तपासणी पथक याचा तपास करणार आहे. दरम्यान गुटटे यांच्या कुटुंबाचे दिवंगत बीजेपी नेता गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबाशी घनिष्ठ संबंध आहेत. रत्नाकर गुटटे यांनी 2014 ची लोकसभा निवडणुकीही लढवली होती. त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची भाजपसोबत युती होती. त्यांचे पुत्र विजय गुट्टे यांना जीएसटी घोटाळ्याच्या आरोपाखाली मागच्या वर्षी अटक करण्यात आली होती.