परत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) ला 13 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून नीरव मोदी आणि त्याचे साथीदार भारताबाहेर पळाले, त्यांचा शोध अजूनही चालू आहे. अशातच परत एकदा पीएनबीमध्ये तब्बल 37 मिलियन डॉलर म्हणजे 268 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे. पीएनबीच्या लंडन येथील शाखेत हा घोटाळा झाला असून, यामध्ये 5 भारतीय कंपन्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना घडल्यानंतर बँकेने कोर्टात धाव घेतली असून, कंपन्यांनी करारपत्रातील अटींचा भंग केल्याचा आरोपही पीएबीने केला आहे.

पीएनबीच्या लंडन येथे सात शाखा आहेत. या कंपन्यांनी खोटी कागदपत्रे दाखवून बँकेकडून करोडो रुपयांची कर्जे घेतली. बँकेचे म्हणणे आहे की, या लोकांनी दक्षिण कॅरोलिनामध्ये तेल रिफायनिंग युनिट सुरु करण्यासाठी आणि पवन ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी कर्ज घेतले. तसेच यांनी त्यांच्या बॅलेंस शीटमध्येही खोटे आकडे दाखवले. प्रोजेक्ट्सविषयी देखील चुकीच्या आकडेवारी सादर केली. यामुळे आता बँकेने पाच भारतीय कंपान्यांसह 1 अमेरिकन आणि 3 अन्य कंपन्यांबाबत तक्रार दाखल केली आहे.

2011 ते 2014 दरम्यान हे कर्ज पीएनबीकडून देण्यात आले आहे. South Eastern Petroleum LLC (SEPL), Pesco Beam USA, Trishe Wind and Trishe Resources अशी या इतर चार कंपन्यांची नवे असून,अमेरिकन डॉलरमध्ये त्यांना हे कर्ज दिले होते. त्याचप्रमाणे यातील एसईपीएल या कंपनीवर बँक ऑफ बडोदाचंही कर्ज असल्याचं पीएनबीने आपल्या आरोपात स्पष्ट केले आहे.