सर्वसामान्यांचे गृहस्वप्न साकारणारी संस्था म्हाडाच्या नावाने सध्या सोशल मीडियावर खोटे मेसेजेस फिरत आहेत. घर खरेदीच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करण्यात येत आहे. ही बाब म्हाडाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे म्हाडाकडून याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. घर हवे असल्यास पेटीएमवर (Paytm) किंवा पोस्टाच्या खात्यावर पैसे पाठवा अशा प्रकराच्या संदेशांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन म्हाडा तर्फे करण्यात आले आहे. तसंच अशा कोणत्याही प्रकराचे पैशाचे व्यवहार पेटीएमद्वारे केले जात नाहीत. या कामासाठी म्हाडा कडून कोणत्याही प्रतिनिधीची नेमणूक करण्यात आलेली नाही, असेही म्हाडाने स्पष्ट केले आहे. (मुंबई: म्हाडात स्वस्त दरात घर देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक, पोलीस शिपायाला अटक)
दरम्यान सोशल मीडिया माध्यमांवर फिरणाऱ्या या मेसेजमध्ये दादर परिसरात म्हाडाची घरे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे घर खरेदीसाठी पेटीएम किंवा पोस्टाच्या खात्यावर पैसे पाठवा असे सांगण्यात येत आहे. तसंच काही घरे विकल्याचे देखील मेसेजमध्ये सांगितले आहे. परंतु, नागरिकांच्या आर्थिक फसवणूकीसाठी हा खोटा संदेश सोशल मीडियावर पसरवला जात असल्याचे आता म्हाडा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. म्हाडाच्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांच्या जाहीराती वर्तमान पत्रातून प्रसिद्ध केल्या जातात. म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर नागरिकांकडून अर्ज मागवले जातात. घराची रक्कम म्हाडाने जाहिरातीत नमूद केलेल्या बँकेतच जमा केली जाते. त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक असते.
त्यामुळे अशा प्रकारच्या संदेशांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. म्हाडाचे घर खरेदी करण्यासाठी म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत सहभाग घ्या. तसंच म्हाडाने घर विक्रीसाठी कोणत्याही मध्यस्थ किंवा दलालांची नेमणूक केलेली नाही, अशा प्रकराचे स्पष्टीकरण म्हाडाने दिले आहे. त्यामुळे तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर त्याला बळी पडून कोणताही आर्थिक व्यवहार करु नका.