Mumbai Crime: फेक ईडी अधिकाऱ्यांचा छापा, 25 लाख रुपये रोख आणि 3 किलो सोने घेऊन पोबारा;  मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) म्हटलं की बड्या बड्या अधिकाऱ्यांपासून उद्योजक आणि व्यवसायिकांचे धाबे दणाणतात. सध्या ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेची देशभर तशी प्रतिमाच निर्माण झाली आहे. धक्कादायक म्हणजे याच छबीचा काही गुन्हेगार वापर करुन त्याचे संधीत रुपांतर करत आहेत. अशीच एक घटना मुंबई (Mumbai) येथील झवेरी बाजार परिसरात उघडकीस आली. या ठिकाणी एका व्यवसायिकाच्या कार्यालयावर चार अज्ञातांनी (Fake ED Officials) छापा टाकला. धक्कादायक म्हणजे त्यांनी आपण ईडीचे अधिकारी (impersonated officer's of Enforcement Directorate) असल्याचे सांगितले. तसे, ओळखपत्रही दाखवले. प्रत्यक्षात हे कोणीच नव्हते. तोतया ईडी अधिकाऱ्यांना व्यवसायिक घाबरला. त्याचा फायदा घेत या तोतयांनी चक्क 25 लाख रुपये रोख आणि तब्बल 3 किलो सोने घेऊन घटनास्थळावरुन पोबारा केला.

व्यवसायिकाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 394, 506 (2) आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटना आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. सीसीटीव्हींच्या आधारे केलेल्या तपासात पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुंबईतील एलटी मार्ग पोलीसांनी ही कारवाई केली. पोलीस सध्या दोन संशयितांची कसून चौकशी करत आहेत. या तपासात अनेक धागेदोरे पुढे येण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Indonesian Betel Nut Smuggling: भारत-म्यानमार सीमेवरून इंडोनेशियन सुपारीची भारतात तस्करी, ईडीकडून महाराष्ट्रात 17 ठिकाणी शोधमोहीम)

ट्विट

तब्बल 25 लाख रुपये रोख आण सुमारे 1 कोटी 70 रुपयांचे 3 किलो वजनाचे दागिणे असे सर्व मिळून सुमारे 4.5 कोटी रुपयांचा ऐवज तोतयांनी लांबवला. सांगितले जात आहे की, आरोपींनी एखाद्या चित्रपटातूनच स्फूर्ती घेतली असावी. 'स्पेशल 26' अशाच प्रकारे तोतया अधिकारी बनून धाड टाकत लूटमार केल्याचे दृश्य आहे. तशाच पद्धतीने आरोपींनी मुंबईतही चोरी करण्याची शक्कल लढवली असावी असा कयास व्यक्त केला जातो आहे. दरम्यान, घडल्या प्रकारामुळे पोलिसच नव्हे तर प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारीही हादरले आहेत.