Indonesian Betel Nut Smuggling: भारत-म्यानमार सीमेवरून इंडोनेशियन सुपारीची भारतात तस्करी, ईडीकडून महाराष्ट्रात 17 ठिकाणी शोधमोहीम
Enforcement Directorate | (Photo Credit: Twitter/ANI)

अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीने (ED) महाराष्ट्रात मुंबई (Mumbai) आणि नागपूर (Nagpur) येथे 17 ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. ज्यामध्ये इंडोनेशियन सुपारीच्या तस्करीमध्ये (Indonesian Betel Nut Smuggling) गुंतलेल्या विविध व्यक्तींचे कार्यालय आणि निवासी परिसर समाविष्ट आहे. प्रामुख्याने या सुपारीची भारत-म्यानमार (India-Myanmar Border) सीमेवरून तस्करी होते. पीएमएलए (PMLA Act) कायद्यानुसार केलेल्या कारवाईत ईडीने ही शोधमोहीम राबवली.

ईडीच्यातपासात पुढे आले, इंडोनेशियन सुपारीचे पुरवठादार, कमिशन एजंट, लॉजिस्टिक प्रदाते, वाहतूकदार, हवाला ऑपरेटर आणि खरेदीदार यांचे एक सुसंघटित सिंडिकेट आहे. जे भारत-म्यानमार सीमेवरून इंडोनेशियन सुपारीची भारतात तस्करी करत होते. ईडीच्या माहितीला पुष्टी देणारे पुरावे मिळताच ईडीने शोधमोहीम सक्रीय आणि अधिक तीव्र केली.

ट्विट

प्राप्त माहितीनुसार, ईडीच्या राबविलेल्या शोधमोहीम आणि टाकलेल्या छाप्यामध्ये नागपूर येथे पीएमएलए अंतर्गत 289.57 मेट्रिक टन बेहिशेबी सुपारी जप्त करण्यात आली आहे. बाजाराभावानुसार तिची किंमत अंदाजे 11.5 कोटी रुपयांची असल्याचे सांगितले जात आहे. ईडीने 16.5 लाख रुपये रोख आणि विविध गुन्ह्यांमध्ये पुरावा ठरु शकतात अशी कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही जप्त केल्याची माहिती आहे.