Fake Covid-19 Vaccination Scam: मुंबईच्या बनावट लसीकरण मोहिमेमध्ये हाय प्रोफाईल डॉक्टरांचा समावेश; 10 लोकांना अटक, कांदिवलीचे Shivam Hospital सील
Vaccine | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

देशात कोरोना विषाणूवर (Coronavirus) मात करण्यासाठी लसीकरण (Vaccination) मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईमध्ये (Mumbai) खोट्या लसीकरणाचा (Fake Covid-19 Vaccination) सुळसुळाट झालेला दिसत आहे. आता मुंबईत बनावट लसीकरण रॅकेटमध्ये हाय प्रोफाइल डॉक्टरही सामील असलेले आढळले आहेत. शुक्रवारी पोलिसांनी कांदिवली येथे असलेल्या शिवम रुग्णालयातील (Shivam Hospital) डॉक्टर जोडपे डॉ शिवराज पटेरिया आणि डॉ. नीता पटारिया यांना अटक केली. बीएमसीच्या पथकाने शिवम रुग्णालयाला सील केले आहे.

या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 लोकांना अटक झाली आहेत. मात्र, याचा सूत्रधार अजूनही पोलिसांच्या जाळ्यात सापडला नाही. सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवारी सांगितले की, चौकशीमध्ये समोर आले आहे की, शिवम रुग्णालयाला पुरविल्या गेलेल्या लसींचा वापर हिरानंदानी हेरिटेज सोसायटी व इतर ठिकाणी आयोजित केलेल्या लसीकरण शिबिरांमध्ये करण्यात आला होता. या संपूर्ण रॅकेटमध्ये पटेरिया दाम्पत्य आणि डॉ. मनीष त्रिपाठी यांचा सहभाग होता. पटेरिया दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे, तर डॉ. त्रिपाठीने अटक टाळण्यासाठी न्यायालयाचा आश्रय घेतला आहे.

लसीकरणासाठी राज्य शासनाने शिवम रुग्णालयाला कोव्हिशील्डच्या 17, 100 व्हायल्स आणि कोव्हॅक्सिनच्या 6250 व्हायल्स दिल्या होत्या. त्यापैकी 16,884 कोव्हिशील्ड आणि 5040 कोव्हॅक्सिन व्हायल्सच्या हॉस्पिटलमध्ये नोंदी आहेत. मात्र त्यातील 216 लसी परवानगी न घेता संजय गुप्ता, महेंद्रसिंग आणि राजेश पांडे यांना देऊन त्यांचा वापर शिबिरांमध्ये करण्यात आला. (हेही वाचा: बुलढाणा: कोविड-19 सॅपल्सची पैशांसाठी फेरफार; वॉर्डबॉय अटकेत)

बनावट लसीकरण प्रकरणात अटक केलेल्या आरोपीने पोलिसांना सांगितले की, लसीचे डोस कमी पडल्यास भेसळयुक्त लस देखील वापरली जात होती. मात्र, लोकांना दिलेली लस भेसळयुक्त आहे की नाही याबाबत पोलिसांकडे ठोस पुरावे नाहीत. अटक केलेल्या आरोपींकडून 12 लाख 40 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. मुख्य आरोपी महेंद्रसिंग आणि त्याचा साथीदार मनीष त्रिपाठी यांचे खाते सील केले आहे. मुंबईत बनावट लसीकरणा मोहिमेबाबत वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत सात एफआयआर नोंदविण्यात आल्या असून, 10 जणांना अटक करण्यात आली आहे.