
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगांव (Khamgaon) येथील सरकारी रुग्णालयात कोविड-19 सॅपल्समध्ये (Covid-19 Samples) फेरफार झाल्याचे समोर आले आहे. एका खासगी कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांचा लाभ घेता यावा, यासाठी रुग्णालयतील वॉर्डबॉयने (WardBoy) चक्क त्यांचे स्वॅबचे नमुनेच (Swab Samples) बदलले. या प्रकरणी विजय राखोंडे या वॉर्डबॉयला अटक करण्यात आली आहे. तो रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी होता. रुग्णालयातील डॉ. निलेश टापरे या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
खाजगी कंपनीतल्या कर्मचाऱ्यांनी मेडीकल कारणांसाठी मिळणाऱ्या सुट्ट्यांचा तसंच इन्शुरन्सचा लाभही घेता यावा, यासाठी त्यांनी विजय राखोंडे याला हाताशी धरला आणि त्याच्या मदतीने स्वॅबचे नमुने बदलून कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे फेक रिपोर्ट्स तयार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Pune: कोविड-19 RT-PCR चाचणीचे फेक रिपोर्ट्स देणाऱ्या दोघांना अटक)
मात्र विजय राखोंडे कोरोना अहवलात फेरफार करत असून स्वॅबचे नमुने बदलले जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. टापरे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत राखोंडे विरोधात तक्रार दाखल केली. राखोंडे चाचण्यांच्या लॅबमध्ये जावून स्वॅब बदलत असे. यासाठी तो कर्मचाऱ्यांकडून पैसे घेत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, याप्रकरणी खासगी कंपनीतील कर्मचारी चंद्रकांत उमप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमप यानेच राखोंडेला चार स्वॅबचे नमुने बदलायला सांगितले होते. याप्रकरणात अजून काही लोक सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे.