Video being shared as Mumbai police chief's message | (Photo Credits: Twitter)

काश्मीर (Kashmir) मधून 370 हटवल्यावर खवळलेल्या पाकिस्तानची प्रतिक्रिया आणि पुढील आठवड्यात येऊ घातलेल्या स्वातंत्र्य दिन (Independence Day) व बकरी ईद (Bakra Eid)  या सणांच्या पार्श्वभूमीवर देशभरात अनेक ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच मुंबईवर सुद्धा दहशवाद्यांचे सावट आहे असे सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओ मध्ये एक व्यक्ती पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI ही देशात हिंसाचार पसरवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा करताना पाहायला मिळत आहे, कथित व्यक्ती ही मुंबई पोलीस आयुक्त असल्याचे म्हंटले जात आहे. अवघ्या काहीच वेळात पसरलेल्या या व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, पण याबाबत तपास करता हा व्हिडीओ खोटा (Fake Video)  असून अशा प्रकारे कोणतेही अलर्ट दिले नसल्याचे समोर आले आहे.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती, पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI चे नाव घेत मुंबईसह देशातील 19 शहरांमध्ये हाय अलर्ट असल्याचे सांगताना पाहायला मिळत आहे, तसेच सुरक्षा कारणास्तव मुंबईत विमानतळ, रेल्वे स्थानक, सिनेमा टॉकीज, किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. हा मॅसेज अधिकी व्यक्तीपर्यंत पोहचवून सर्वांना दक्ष करा असेही सांगितले आहे.

पहा व्हायरल व्हिडीओ

याबाबत तपास केला असता, या व्हिडिओतील व्यक्ती ही मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे नसून कोणीतरी भलतीच असल्याचे समजत आहे. तसेच पोलीस आयुक्त बर्वे, मुंबई पोलिस किंवा देशातील अन्य कोणत्याच विश्वासार्ह्य संघटनेने याबाबत माहिती दिल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे या व्हिडीओची पुष्टी न झाल्याने हा एक खोटा व्हिडीओ असल्याचे सिद्ध झाले आहे.

दरम्यान आज, नौदलाचे उपप्रमुख मुरलीधर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान मधील दहशतवादी संघटना 'समुद्री जिहाद'चा कट रचत असल्याची माहिती भारताच्या गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. ज्यावर खबरदारी म्हणून भारतीय नौदलाला हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच या परिस्थितीत सीमेवर व देशात अनेक ठिकाणी सैन्याच्या तुकड्या देखील जागृक आहेत. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता अशा प्रकारचे खोटे मेसेज पसरवू नये.