Medha Patkar |

राज्यात आणि देशभरातील राजकीय नेत्यांवर अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) ईडी(ED) आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचे धाडसत्र सुरु असतानाच या संस्थांच्या एका कारवाईमुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. ईडीने आता ज्येष्ठ पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीसोबतच महसूल गुप्तचर संचालनालय (DIR) आणि आयकर विभागाकडूनही (Income Tax Department) पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मेधा पाटकर या अचानकपणे ईडीच्या रडारवर आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हे प्रकरण 2005 चे म्हणजेच पंधरा ते सोळा वर्षांपूर्वीचे आहे. याच प्रकरणात ईडी आणि इतर काही संस्था मेधा पाटकर यांची चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे.

मेधा पाटकर यांच्या ‘नर्मदा नवनिर्माण अभियान’ या बिगरशासकीय सेवाभावी संस्थेत (NGO) काही संशयास्पद व्यवहार झाल्याचा आरोप झाल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणात महसूल गुप्तचर संचालनालय (DIR) आणि आयकर विभागाकडूनही मेधा पाटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, Sanjay Raut On Enforcement Directorate: ईडीने मालमत्ता जप्त केल्यानंतर शिवसेनास खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया, 'घाबरत नाही, तुम्हाला फाट्यावर मारतो')

‘नर्मदा नवनिर्माण अभियान’ या संस्थेची नोंदणी बृहनमुंबई चॅरिटी कमिशन यांच्याकडे आहे. या संस्थेमध्ये मेधा पाटकर या प्रमुख विश्वस्त आहेत. या एनजीओला एकाच दिवशी तब्बल 1,19,25,080 (एक कोटी एकोणीस लाख पंचवीस हजार ऐंशी) रुपयांच्या देणग्या प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळेच ही संस्था आणि पर्यायाने मेधा पाटकर या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना मेधा पाटकर यांनी म्हटले आहे की, मझ्या विरोधात तक्रार दाखल झाली आह. मात्र, गुन्हा दाखल झालेला नाही. माझ्या विरोधात राजकीय कारस्थान केले जात आहे. ज्या लोकांनी आमच्याविरोधात तक्रार केली आहेत ते लोक राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. हे पक्ष आमच्याशी समविचारी नाहीत. त्यांनी तक्रार दाखल केली आहे. यात 20 लोकंनी एकच रक्कम जमा केली असा त्यांचा दावा आहे. पण, असे काहीही घडले नाही. त्यामुळे हे प्रकरण हँकींगचे असावे असे सध्यातरी वाटते. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हावा.