Sanjay Raut | (Photo Credits: Facebook)

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने (ED) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आलिबाग (Alibag) येथील जमीन आणि मुंबई (Mumbai) येथील राहते घर जप्त केले. या कारवाईमुळे राज्यासह देशाच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या रोखठोक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. 'ईडीकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने करण्यात येत आहे. ही कारवाई करण्यापूर्वी आम्हाला एक नोटीसही देण्यात आली नाही. आम्ही असल्या कारवाईला घाबरत नाही. माझी जी काही मालमत्ता आहे ती कष्टाची आहे. त्यामुळे असल्या कारवाईला मी फाट्यावर मारतो' अशा शब्दांत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही जी काही मालमत्ता घतली आहे ती कष्टाच्या पैशांतून घेतली आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे मनी लॉन्डींग झाले नाही. ईडीने नीट चौकशी करावी. आमच्या व्यवहारात एक पैसाही फ्रॉडचा निघाला तर माझी सर्व संपत्ती भाजपला दान करेन आणि राजकारण, समाजकारण यांतून निवृत्ती घेईन, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. आम्ही जी प्रॉपर्टी घेतली ती 2009 मधील आहे. आता इतकी वर्षे झाल्यानंतर त्यांना त्यात मनी लॉन्ड्रींग दिसू लागले आहे. मी पुन्हा सांगतो मनी लॉन्ड्रींगच्या एका पैशातून आम्ही ही प्रॉपर्टी विकत घेतली असेल तर ती मी भाजपला दान करेन असा पुनरुच्चारही त्यांनी या वेळी केला. ते दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (हेही वाचा, Patra Chawl Land Scam Case: शिवसेना नेते संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा विचार माझ्या धमण्यांमध्ये खेळतो आहे. मी मराठी माणूस आहे. गुडघे टेकणार नाही. माझा पक्ष आणि लोकांचे प्रेम हीच आमची संपत्ती आहे. ईडीच्या असल्या कारवाया आम्ही फाट्यावर मारतो. त्यामुळे ईडीची कारवाई झाली. ठिक आहे. काही हरकत नाही. अशा कारवाया यांनी करत राहाव्या. त्यातून आम्हााल बळ मिळते. आम्ही पुढेही लढत राहू, असे संजय राऊत म्हणाले. ही कारवाई झाल्याचे मला प्रसारमाध्यमांतूनच कळाले. ही कारवाई झाल्याचे वृत्त बाहेर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अनेक लोकांचे मला फोन आले. त्यांनीही या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली. हे सर्व लोक माझ्या पाटीशी आहेत. माझ्यावर टाकण्यात येत असलेल्या दबावाबाबत मी राज्यसभेच्या सभापतींनाही त्या वेळी पत्र लिहीले होते, अशी आठवणही संजय राऊत यांनी या वेळी करुन दिली.