मुंबईतील अरुंद गल्ल्यामुळे शहरामध्ये कचरा संकलनाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. परंतु, आता मुंबई महानगरपालिकेने यावर तोडगा काढला आहे. वरळी शहरातील कोळीवाडा परिसरात कचरा संकलन करण्यासाठी महानगरपालिकेने ई-रिक्षा (Electric Tricycle) उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत अरुंद गल्ल्यातील कचरा गोळा करण्यासाठी (Waste Collection) इलेक्ट्रिक ट्रायसायकल सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता अरुंद गल्ल्यातून कचरा संकलन करणे सोपे होणार आहे.
पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून कोळीवाडी परिसरातील या नवीन स्वच्छता उपक्रमासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी मुंबई महापालिकेचे ट्विट रिट्विट केले आहे. तसेच याबाबत मुंबई महानगरपालिकेनेही आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली असून काही ई-रिक्षांचे फोटोही शेअर केले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ई-रिक्षा उपक्रमाला कोळीवाड्यात सुरुवात करण्यात आली आहे. (हेही वाचा - Swachh Sarvekshan 2020 मध्ये BMC कडून वरळी ला सर्वात 'स्वच्छ वार्ड' चा पुरस्कार घोषित)
Innovative methods of collecting waste from the lanes of Koliwada! https://t.co/kdIWzwBhOs
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 18, 2020
या ई-रिक्षामध्ये सुमारे 500 किलो कचरा वाहून नेता येणार आहे. या रिक्षाचा वेग ताशी 25 किलोमीटर असणार आहे. ई-रिक्षा बहुपयोगी आहे. या रिक्षाच्या साहाय्याने शहरातल्या अरुंद गल्ल्यांमध्ये वेगाने कचरा संकलन करण्याचे काम करता येणार आहे. या उपक्रमामुळे शहर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.
आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. त्यामुळे आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघाच्या सोयी-सुविधांवर लक्ष ठेवून आहेत. आज स्वच्छता सर्वेक्षण 2020 च्या अहवालानुसार मुंबईतील G-South वार्ड म्हणजेच वरळीला सर्वात स्वच्छ वार्डचा पुरस्कार देण्यात आला आहे.