Chandrakant Patil On CM Eknath Shinde: मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद, चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली भाजपमधील खदखद
Chandrakant Patil | (Photo Credit - Twitter)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देण्यात आलेल्या मुख्यमंत्री पदावरुन भाजपमध्येही सगळेच काही अलबेल नाही. भाजमध्येही जोरदार खदखद आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदामुळे भाजपमध्ये एक मोठा गट नाराज असल्याचे पुढे आले आहे. भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या भाषणातील वक्तव्यामुळे या नाराजीची अधिक चर्चा उघडपणे सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेऊन मुख्यमंत्री केल्याची भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. पनवेल येथे भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केलेल्या भाषणात पाटील यांनी यांनी हे व्यक्तव्य केले.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला. आम्ही सर्वांनी तो मनावर दगड ठेऊन मान्य केला. पण आता आपण त्या सगळ्यातून पुढे गेलो आहोत, असे उद्गार चंद्रकांत पाटील यांनी काढले आहेत. केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयामुळे आपल्याला दु:ख झाले. पण हे दु:ख पचवून आपण पुढे गेलो असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, पाटील यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाल्याने हे भाषण आता सोशल मीडियावरुन हटवल्याचे समजते. (हेही वाचा, Eknath Shinde यांच्या सुरक्षेत वाढ करू नका असे Uddhav Thackeray यांनी मला कधीच सांगितले नाही, Dilip Walse-Patil यांचे वक्तव्य)

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, राज्यात पाठीमागचे अडीच वर्षे काय परिस्थिती होती हे आपण पाहिले. आता परिस्थिती बदलली. राज्यात सत्ता बदल होण्याची गरज होती. ती पूर्ण झाली. मात्र ही गरज पूर्ण करताना एक समज असलेला सर्वसमावेशक माणूस देण्याची गरज होती. ही गरज पूर्ण करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने आणि खास करुन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे दु:ख झाले असले तरी आपण ते पचवून पुढे गेलो आहोत.