Deepak Kesarkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून हटविणे हा आमचा हेतू नव्हता- दिपक केसरकर
Deepak Kesarkar (Photo Credit- ANI)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा राजीनामा आमच्यासाठी वेदनादायी आहे. त्यांना पदावरुन हटवणे हा आमचा हेतू नव्हता. आमची एकच मागणी होती, समविचारी पक्षासोबत जाऊया. तरीही, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) पक्षासोबत आघाडी कायम ठेवली. त्यामुळे आमच्या विरोधी पक्षासोबत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत लढताना आम्हाला आमच्या नेतृत्वासोबत लढावे लागले. आजही आम्ही शिवसैनिकच आहोत. उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत, अशी प्रतिक्रीया एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे नेते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी व्यक्त केली आहे. दिपक केसरकर हे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत.

प्रसारमाध्यमातून बातम्या येत आहेत की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी सेलिब्रेशन केले. पण, आमदारांनी अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे सेलिब्रेशन केले नाही. आमच्या नेत्याला मुख्यमंत्री पदावरुन निघून जावे लागले, याचे प्रचंड दु:ख आहे. असेही दिपक केसरकर म्हणाले. आजही आम्ही शिवसेनेतच आहोत. आजही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. तो कायम राहील, असेही दिपक केसरकर यांनी म्हटले आहे.  (हेही वाचा, Eknath Khadse On Uddhav Thackeray: शिवसेना गटनेता मला आमदारांनीच केले, उद्धव ठाकरे यांचा राजीनामा वेदनादायी- एकनाथ शिंदे)

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या कोणत्याही आमदाराच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अनादराची भावना नाही. उलट त्यांच्याबद्दलचा आदर कायम आहे. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत हे ज्या पद्धतीने आमच्यावर आरोप करत आहेत. ते जी भाषा वापरत आहेत त्यामुळे शिंदे यांच्यासोबतचे आमदार प्रचंड व्यथित आहेत, असेही केसरकर म्हणाले.

ट्विट

दरम्यान, स्वत: एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, शिवसेना गटनेता आजही मीच आहे. 50 आमदारांनी मिळून माझी गटनेता पदावर निवड केली. शिसेनाप्रुमख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला मविआच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला. आमदारांच्या भावना आगोदरच जाणून घेतल्या असत्या तर ही वेळ आलीच नसती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याचे आम्हाला प्रचंड दु:ख आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला कालही आणि आजही आदर आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे हे आज (30 जून) राज्यपाल आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांसोबत आज भेट होणार आहे. नव्या सरकारमधील सत्तावाटपाबद्दल कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. त्यामुळे कोणीही उगाच बातम्या पसरवू नका. अद्याप कोणतीही बोलणी झाली नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी या वेळी म्हटले.