नागपूरातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ कोसळली वीज, आठ विद्यार्थी जखमी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून नागपूरात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातलाय. नागपुरातील रामटेक तालुक्यात गुरुवार पासून सुरु असलेल्या पावसात आसोलीतील जिल्हा परिषद शाळेजवळ वीज कोसळून आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ज्यातील 2 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. नयन कडबे आणि तेजू दूरबुडे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

नागपुरातील रामटेक आणि मौदा तालुक्यात गुरूवारी चांगलाच पाऊस झाला. त्यावेळी असोली या ठिकाणी वीज कोसळली. शाळेच्या छताचं आणि इमारतीचं प्लास्टर पडल्याने काही विद्यार्थी जखमी झाले. यात नयन आणि तेजू यांची प्रकृती गंभीर असून इतर 6 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांवर आधी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा- अकोला : वीज कोसळल्याने मोबाइलवर बोलणाऱ्या युवकाचा मृत्यू

महाराष्ट्रात काल ब-याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. रत्नागिरी संपूर्ण कोकण पट्ट्यातही चांगला पाऊस पडतो आहे. तर मुंबईतील ठाणे, मुलुंड, डोंबिवली, बदलापूर भागातही चांगलाच पाऊस सुरु झाला आहे.

काही दिवसांपूर्वी मोबाईलवर बोलताना वीज कोसळून अभिजीत श्रीकृष्ण इंगळे (वय २२, रा. वाघजाळी, ता. बार्शीटाकळी) या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना अकोल्यातील पातूर परिसरात घडली.