Lightning | (Photo credit: archived, edited, representative image only)

पाऊस पडत असताना आणि आकाशात ढगाळ वातावरण असताना मोबाईल (Mobile) बोलणे एका युवकाच्या जीवावर बेतले आहे. मोबाईलवर बोलताना वीज कोसळून अभिजीत श्रीकृष्ण इंगळे (वय २२, रा. वाघजाळी, ता. बार्शीटाकळी) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर, या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना अकोला (Akola) जिल्हायातील पातूर परिसरात शनिवारी दुपारी घडली.

प्राप्त माहितीनुसार, पातूर परिसरात शनिवारी दुपारी वीजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडत होता. दरम्यान, अभिजीत इंगळे हा युवक आठवडी बाजारातून घरी परतत होता. दरम्यान, हा युवक अकोला-पातूर रोडवरील ३३ केव्हीजवळ एका झाडाखाली मोबाईलवर बोलत उभा होता. या वेळी मेघगर्जनेसह वीज कोसळली आणि हा युवक जागीच ठार झाला.

दरम्यान, अभिजीत इंगळे याच्यासोबत आणखी एक युवक होता. या घटनेत हा युवकही गंभीर जखमी झाला. वीज कोसळल्याची माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी खासगी वाहनाने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी अभिजित इंगळे या युवकाला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. तर, जखमी युवकावर उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, कोल्हापूर, औरंगाबाद, यवतमाळ वाशिम जिल्ह्यांसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी)

दरम्यान, मान्सून सरी अद्याप म्हणाव्या तशा कोसळत नसल्या तरी, राज्यातील काही जिल्ह्यांत मात्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यात कोल्हापूर , औरंगाबाद , यवतमाळ जिल्ह्यांसह अनेक ठिकाणांचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थिती, त्यात पावसाने दिलेली ओढ यामुळे राज्यातील शेतकरी आणि जनता हवालदील झाली असतानाच पावसाने शनिवारी दमदार हजेरी लावली.