मान्सून सरी अद्याप म्हणाव्या तशा कोसळत नसल्या तरी, राज्यातील काही जिल्ह्यांत मात्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यात कोल्हापूर (Kolhapur), औरंगाबाद (Aurangabad), यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यांसह अनेक ठिकाणांचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थिती, त्यात पावसाने दिलेली ओढ यामुळे राज्यातील शेतकरी आणि जनता हवालदील झाली असतानाच पावसाने शनिवारी दमदार हजेरी लावली.
कोल्हापूर
पावसाने गेल्या आठवड्यात काहीशी हुलकावणी दिली होती. त्यामुळे कोल्हापूरकरही पावसाच्या प्रतिक्षेत होते. मात्र, पावसाने शनिवारी सायंकाळी आगमन करत साधारण साधारण अर्धा ते पाऊण तास चांगलीच दमदार हजेरी लावली. आर्द्रा नक्षत्रावर पडलेल्या पावसामुळे कोल्हापूर शरहासह जिल्ह्यातही समाधानाचे वातावरण आहे. कोल्हापूर शहरासह गडहिंग्लज, गारगोटी, चंदगड आणि पाटगाव धरण क्षेत्रात चांगलाच पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे फेरीवाल्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
यवतमाळ
राज्यातील इतर भागांप्रमाणे येवतमाळ जिल्ह्यातही पावहासाची प्रतिक्षा होती. मात्र, शनिवारी कोसळलेल्या सरींनी ती संपली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या सरींमुळे दिलासा मिळू शकला. दरम्यान, जिल्ह्यात अद्याप मान्सून दाखल झाला नाही. त्यामुळे इतक्या पावसारव शेतकऱ्यांनी पेरणी करावी अशी स्थिती नाही. (हेही वाचा, येत्या 24 तासांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता; Skymet चा अंदाज)
औरंगाबाद
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातही पावसाने प्रदीर्घ काळानंतर दमदार हजेरी लावली. औरंगाबाद शहरात दमदार पाऊस पडल्यानंतर जयभवानीनगर, सिडकोत एन ४ राठी कॉर्नर, बायजीपुरा, माता कॉर्नर, एन ८ आझाद चौक गील्टी सोसायटी, उल्कानगरीत बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरले.