येत्या 24 तासांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता; Skymet चा अंदाज
Monsoon 2019 (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राची मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपणार असून येत्या 24 तासांत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने व्यक्त केला आहे. 23 जून रोजी मुंबईसह रत्नागिरी, डहाणू, महाबळेश्वर या शहरांमध्ये पाऊस जोर धरेल. तर 23 जूननंतर कोकण आणि गोव्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू राहील. (शेतकऱ्यांना खुशखबर! दक्षिण कोकणमध्ये मान्सून दाखल, पुढील 3 ते 4 दिवसांत मुंबईसह उर्वरीत महाराष्ट्रात पोहोचणार)

स्कायमेटच्या अंदाजानुसार, बंगालच्या खाडीमध्ये बनलेला कमी दाबाचा पट्टा अजूनही कायम आहे. त्यामुळे ओडिसा, झारखंड, तेलंगाणा, छत्तीसगड, आंध्रप्रदेशसह तामिळनाडू मध्ये पाऊस झाला. मात्र आता नैऋत्य मान्सून वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांचा प्रवास जलद गतीने होईल आणि येत्या 2-3 दिवसांत राज्यात वरुणराजा बरसेल. (मुंबईकरांसाठी 'बीएमसी'चा MCGM मोबाईल ऍप, टोल फ्री कॉल आणि whatsapp नंबर, पावसाळ्यात समस्या आल्यास या क्रमांकावर मिळणार मदत)

18 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर 1 जून रोजी त्याचे केरळात आगमन होईल, असे अपेक्षित होते. मात्र मान्सून यंदा केरळात देखील आठवडाभर उशिराने पोहचला. 8 जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला. मात्र त्याचदरम्यान सक्रिय झालेल्या वायू चक्रीवादळामुळे त्यात अडथळा आला. वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर संथ गतीने मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरु झाला. 14 जून रोजी मान्सूनचे कर्नाटक, तामिळनाडूमध्ये आगमन झाले. त्यानंतर काल (20 जून) मान्सूनने कोकणात प्रवेश केला. त्यानंतर आता येत्या 2-3 दिवसात मान्सून महाराष्ट्र चिंब करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.