Sanjay Raut Arrest: संजय राऊत प्रकरणात ईडीकडून आणखी दोन ठिकाणी छापेमारी, शोधमोहीम सुरुच
Sanjay Raut | (Photo Credit - Twitter)

संजय राऊत (Sanjay Raut) यांना अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीने अटक केली असताना याच प्रकरणात सुरु असलेली कारवाई अद्यापही सुरुच आहे. पत्रा चाळ प्रकरणाशी संबंधीत असल्याच्या संशयावरुन ईडीने आणखी दोन ठिकाणी छापे टाकले आहेत. दोन्ही ठिकाणी संजय राऊत यांचा संबंध असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही ठिकाणी ईडीचे अधिकारी शोध मोहीम राबवत आहेत. शिवाय याच प्रकरणात आणखीही काही लोकांना समन्स पाठवल्याचेही प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्यात दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांना न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालयाने संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ईडीने राऊत यांच्या 8 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत 4 दिवसांचीच कोठडी दिली. त्यामुळे 4 ऑगस्ट रोजी संजय राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. (हेही वाचा, CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनच नियमांचे उल्लंघन? पोलिसांत तक्रार दाखल, अजित पवार यांच्याकडूनही दखल)

दरम्यान, संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना जोरदार आक्रमक झाली आहे. शिवसैनिकांनी आज मातोश्री येथे मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केले. दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. या दौऱ्यांनाही जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले असले तरी, जनतेतून मात्र उद्धव ठाकरे यांनाच सहानभुती मिळत असल्याचे बोलले जाते आहे.