कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुढील 3 महिने 5 रुपयांमध्ये मिळणार शिवभोजन थाळी; छगन भुजबळ यांची माहिती  
Shivbhojan Thali (PC - Twitter)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर अनेक उद्योग, व्यवसाय बंद झाले. अशावेळी महाराष्ट्रातील गोर-गरिबांना ठाकरे सरकारच्या शिवभोजन थाळीने (Shiv Bhojan Thali) फार मोठा दिलासा दिला. राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी उपक्रम सुरु आहे, ज्याद्वारे दररोज हजारो लोकांचे पोट भरले जाते. आता सरकारने एक मोठा निर्णय घेत पुढील 3 महिन्यांसाठी 5 रुपयांमध्ये ही शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याचा विचार केला आहे. राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

याआधी मार्चमध्ये राज्य सरकारने लॉक डाऊनमुळे कोणीही उपाशी राहू नये यासाठी 5 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली होती. त्यावेळी ही सुविधा फक्त जूनपर्यंत असेल असे सांगितले होते. मात्र आता यामध्ये 3 महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. आता पुढील 3 महिन्यांपर्यंत गरजूंना 5 रुपयांमध्ये शिवभोजन थाळीचा लाभ घेता येणार आहे. यासह, कष्टकरी,असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून, प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. (हेही वाचा: देशात महाराष्ट्रात बरे झाले सर्वाधिक कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण; केंद्र सरकारने जाहीर केली Highest Recovery झालेल्या 15 राज्यांची यादी)

गरजेनुसार, शिवभोजन थाळीच्या वेळेत वाढ करण्यात आली असून, सकाळी 11  ते 3 या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरी भागासाठी प्रति थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रति थाळी 30 रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने 160 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शिवभोजन थाळी केंद्रावरही स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन व्हावे अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. यामध्ये मास्कचा वापर करणे, लोकांमध्ये 3 फुटाचे अंतर ठेवणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घेणे, भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, अशा गोष्टींचा समावेश आहे.