दुष्काळाचे सावट असलेल्या महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी होणार का? राज्यातील जनतेला उत्सुकता
Rain and drought | (Photo Credit: PTI / Pixabay)

Drought crisis in Maharashtra: राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप तरी म्हणावा तसा पाऊस पडलाच नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश्य स्थिती आहे. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे राज्यभरातील शेतकरी आणि जनता हवालदिल झाली असतानाच आता राज्यात पुन्हा एकदा कृत्रिम पावसाचा प्रयोग (Artificial Rain) राज्य सरकार करु पाहात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी हा प्रयोग सुरु असून येत्या काही दिवसांत मराठवाड्यातही (Marathwada) हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात येत्या 30 जुलैनंतर कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात होणार आहे.

राज्यात या आधीही कृत्रिम पावसाचा प्रयोग दोन वेळा झाला आहे. तेव्हा झालेल्या प्रयोगाला विशेष असे यश मिळाले नव्हते. आता काही वर्षांनंतर राज्य सरकार पुन्हा एकदा हा प्रयोग करत आहे. आता तिसऱ्या प्रयत्नात तरी राज्य सरकारला कृत्रिम पावसाच्या प्रयोगात यश येणार का याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, यंदा ग्रामीण महाराष्ट्रासह शहरांतही पाणीटंचाई पाहायला मिळाली. उशीरा का होईना पाऊस आला. अन्यथा, राजधानी मुंबई आणि उपनगरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला असता. दुसऱ्या बाजला ग्रामीण भागात दुष्काळसदृश्य स्थिती असून, काही भागात तर तीव्र पाणीटंचाई आहे. ऐन पावसाळ्यात ही स्थिती तर, उन्हाळ्यात काय परिस्थिती उद्भवेल ही कल्पनाच लोकांना घाबरवून सोडणारी असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. (हेही वाचा, खुशखबर! राज्यात 30 जुलै पर्यंत कृत्रिम पाऊस पडणार, प्रक्रिया झाली पूर्ण: पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर)

काय म्हणाले पाणीपुरवठा मंत्र बबनराव लोणीकर

पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी माहिती देताना म्हटले की, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केंद्र सरकारकडून साधारण 10 प्रकारच्या परवानग्या मिळवाव्या लागतात. या परवानग्या मिळविण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. केंद्राकडून साधारण 30 जुलै पर्यंत या परवानग्या मिळतील. त्यानंतर मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगास सुरुवात होईल. या प्रगोयासाठी राज्य मंत्रिमंडळाने 30 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. आता केंद्राकडून विविध परवानग्या मिळविण्यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असल्याचे लोणीकर म्हणाले.पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाऊड सीडिंगची (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, असेही लोणीकर म्हणाले.