
Kartiki Ekadashi Yatra: कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर यंदा कार्तिकी यात्रेनिमित्त (Kartiki Yatra) निघणाऱ्या दिंड्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. यासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी आदेश दिले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी यावर्षी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील मंदिरात नित्योपचार काही मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्या मार्गस्थ होणार नाहीत. यासाठी पोलीस, महसूल आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे आदेश देशमुख यांनी दिले आहेत.
राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. मात्र, तज्ञाच्या मते दिवाळी आणि हिवाळ्यात कोरोना व्हायरसचे संक्रमण अधिक वाढण्याची शक्यता आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं परिस्थिती अधिक भयानक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात अधिक खबरदारी घेणं गरजेचं आहे. (हेही वाचा - Coronavirus: WHO ची मोठी घोषणा; कोरोनावर देण्यात येणाऱ्या औषधांच्या यादीतून Remdesivir बाद)
दरम्यान, यंदा 26 नोव्हेंबर ला कार्तिकी एकादशी आहे. कार्तिक वारी ही वर्षातील दुसरी मोठी वारी आहे. यावर्षी संपूर्ण देशावर कोरोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे पंढरपूरात वारकऱ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी कार्तिकी यात्रेचा कालावधी 30 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. या यात्रेसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरात दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा योग्य खबरदारी घेऊनचं सर्व कार्तिकी एकादशीचा सोहळा मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
कार्तिकी एकादशी निमित्त राज्य शासनाने विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना पंढरपूरकडे दिंड्या पाठवू नका, असे आदेश दिले आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. याशिवाय कार्तिक एकादशीच्या दिवशी पंढरपूर आणि परिसरातील 8 ते 10 गावांमध्ये संचारबंदी लावण्यात येणार आहे.