शेतकऱ्यांना दिलासा; पिक पंचनाम्यासाठी मोबाइलवरून फोटो पाठवले तरी चालेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | (Photo Credits: ANI)

राज्यामध्ये गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रशासनाला पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या पंचनाम्याला विलंब झाल्यास शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलवरून फोटो अपलोड केले तरी चालेल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी विमा कंपन्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकाचे फोटो काढून ते पाठवले तरी चालेल, असे सांगितले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट - 

हेही वाचा - नाशिक: पिकाची नुकसान पाहण्यासाठी शरद पवार पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर

अवकाळी पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ५३ हजार हेक्टरमध्ये फळपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच कोकणात ४६, नाशिकमध्ये ५२ आणि नागपूरमध्ये ४८ तालुक्यात खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून मदतीची मागणी करणार असल्याचं सांगितले आहे. पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मदत दिली जाईल. तसेच ज्या पिकांचे पंचनामा होऊ शकले नाही अशा शेतकऱ्यांनाही मदत देण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली. तसेच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही नाशिक येथील शेतकऱ्यांची भेट घेतली.

हेही वाचा - सावधान! पुण्यात पुढचे 48 तास मुसळधार पाऊस

अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे नाशिक जिल्ह्यातील तब्बल ३ लाखांहून अधिक हेक्टर म्हणजे निम्म्या क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मका, द्राक्ष, सोयाबीन, लेट खरीप कांदा पिकांना सर्वाधिक फटका बसला. नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाचा सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, देवळा तालुक्यांना सर्वाधिक तडाखा बसला आहे. बागलाण, निफाड, दिंडोरी परिसरांतील द्राक्ष बागांना अधिक फटका बसला आहे. पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.