Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप - 'मला सलाईनमधून विष देण्याचा फडणवीसांचा डाव'
Manoj-Jarange-Patil | Twitter

महाराष्ट्र सरकार कडून स्वतंत्र प्रवर्गाच्या माध्यमातून मराठ्यांना 10% आरक्षणाची घोषणा झाली आहे. मात्र ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'मराठ्यांना अपेक्षेप्रमाणे आरक्षण न देण्यामागे फडणवीसांचा हात असून त्यांनी सलाईन च्या माध्यमातून मला विष देण्याचा, माझा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा' खळबळजनक आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. 'मराठा समाजाचा पुन्हा दरारा निर्माण होत आहे. हा (जरांगे पाटील) ऐकत नसल्याने आता त्याला आंदोलनात तरी मरू द्यावं लागेल. बदनाम तरी करावं लागेल किंवा एन्काऊंटर तरी करावा लागेल हा प्लॅन असल्याने आपण परवा पासून सलाईन घेणं बंद केल्याचं' जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मराठा समाजाला बदनाम करण्याच कारस्थान त्यांनी आखलं असल्याचं मनोज जरांगे पाटील आज पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी 'सागर बंगल्यावर येतोय घ्या बळी' असं म्हणत त्यांना ललकारलं आहे. तुम्ही माझा बळी घ्या, पण खोटे आरोप सहन करणार नाही, तुम्हाला कायमचा आयुष्यातून उठवेन मी पण एका शेतकर्‍याचा पोरगा आहे अशा शब्दात जरांगेंनी आव्हान दिलं आहे. फडणवीसांच्या कारस्थानामध्ये शिंदे आणि पवार गटाचे देखील आमदार/प्रवक्ते असल्याचे ते म्हणाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाची मागणी ठाम ठेवत हे आंदोलन पुढे कायम ठेवले जाणार असल्याची घोषणा करताना आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. 'या निवडणूकींमध्ये तुमचा सुफडा साफ होणार आहे असे म्हणताना त्यांना कुणी पुढे गेलेलं आवडत नसल्याचंही बोलून दाखवलं आहे. धाक दाखवून त्यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेमधून, अजित पवारांना एनसीपी मधून दूर केलं असल्याचं म्हटलं आहे.' देवेंद्र फडणवीसांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे काही लोक मराठा समाजाला संपवण्यासाठी कारस्थानं करत असल्याचं ते म्हणाले आहेत. HC Issues Notice to Manoj Jarang Patil: जबाबदारी घेणार का? मनोज जरांगे पाटील यांना हायकोर्टाची नोटीस .

मराठा आरक्षण प्रश्नी आता उग्र आंदोलन करण्याचे आदेश त्यांनी समाजाला दिले आहेत. दरम्यान त्यांनी अन्न,पाण्याचा त्याग करत पुन्हा उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील मुंबई कडे निघण्याच्या तयारी मध्ये आहेत.