Deep Cleaning Drive in Mumbai: मुंबईमधील स्वच्छता मोहिमेत CM Eknath Shinde सहभागी; शहर प्रदुषणमुक्त व खड्डेमुक्त करण्यासाठी सरकार अॅक्शन मोडवर
CM Eknath Shinde (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबईमध्ये (Mumbai) आज संपूर्ण स्वच्छता मोहीम (Deep Cleaning Drive) राबवण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही सहभाग नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता मोहीम राबवून सर्वांसाठीच स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे. हीच प्रेरणा घेऊन मुंबई प्रदुषणमुक्त, स्वच्छ व हरित करण्याचा ध्यास घेत आता मुंबई खड्डेमुक्तही असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

संपूर्ण स्वच्छता मोहीम अंतर्गत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या‍ चार परिमंडळातील चार प्रशासकीय विभागामध्ये (वॉर्ड) स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले. एन विभागातील अमृत नगर सर्कल येथून सकाळीच या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ झाला. स्वच्छता करण्यासाठीचे ग्लोव्हज हातात घालून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.

त्यानंतर एन विभागातील कामराज नगर व घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालय परिसरात मुख्यमंत्री शिंदे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. एम पश्चिम विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, टिळक नगर, भैरवनाथ मंदीर मार्ग, एफ उत्‍तर विभागातील भैरवनाथ मंदीर मार्ग, येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ घेण्यात आली. अतिरिक्त मनुष्यबळासह विविध संयंत्राच्या सहाय्याने वॉर्डतील कानाकोपऱ्यांची स्व‍च्छता करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसह मुंबईकर नागरिकांनी देखील या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग  घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई शहरांतील प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी ही स्वच्छता मोहीम प्रामुख्याने हाती घेण्यात आली आहे. स्वच्छता अभियानासाठी जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. मुंबईकरांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही मोहीम नक्कीच उपयुक्त ठरेल. याचा सकारात्मक परिणाम निश्चितच जाणवेल. ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असून या मोहिमेत लोकसहभाग वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. त्यादृष्टीने मुंबई आपल्याला स्वच्छ, सुंदर व हरित ठेवलीच पाहिजे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘आपला दवाखाना’ची संख्या वाढविण्यात येत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना सर्व अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत असून त्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन स्वच्छता मोहीमेच्या कामांचा वेळोवेळी आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राजावाडी रुग्णालय मुंबईकरांठी महत्त्वाचे आहे. या रुग्णालयाची क्षमता 1000 बेडपर्यंत वाढविण्याचा मानस असून, अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल. हॉस्पिटलमधील स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत असून बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

रुग्णालयात असताना नागरिकांना औषधे बाहेरुन आणावी लागू नयेत यासाठी ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ संकल्पना लागू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी, मुंबई स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सुरू असलेली स्वच्छतेची ही चळवळ फक्त महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न राहता ही लोकचळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकराचा सहभाग यात आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी, मुंबई महापालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतात, त्यांच्यामुळेच मुंबई, स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’ असल्याची कौतुकाची थाप सफाई कर्मचाऱ्यांना देत त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. (हेही वाचा: Maharashtra Drugs: महाराष्ट्र पोलिसांनी जप्त केले 50 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज; राज्यात होणार ॲन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्सची स्थापना, Devendra Fadnavis यांची माहिती)

संपूर्ण मुंबई शहरात टप्प्या टप्प्याने डीप क्लीनिंग मोहीम घेण्यात येणार असून स्वच्छता अभियानाद्वारे वाढत्या प्रदूषणालाही आळा बसणार आहे. यामध्ये रस्ते, नाले, फूटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृह यांची स्वच्छता प्राधान्याने करण्यात येत आहे. बांधकाम क्षेत्रातील राडारोडा याचीही सफाई करण्यात येत आहे. डीप क्लीनिंग मोहिमेद्वारे स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबईकडे वाटचाल होत असल्याचे शिंदे म्हणाले. मुंबईतले संपूर्ण मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, अंतर्गत वसाहतीचे डीप क्लिनींग या अभियानाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. यासाठी पिण्याचे पाणी आपण  वापरत नाही, तर रिसायकलींग केलेले पाणी वापरले जाते. या मोहिमेत चार-पाच वार्डाचे मिळून किमान दोन हजार लोक एकावेळी एका परिसरात काम करीत असल्याने परिसर पूर्णपणे स्वच्छ होतो.