शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 30 ऑक्टोबर 1966 मध्ये सुरु केलेली शिवसेना दसरा मेळावा परंपरा आजही सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे इतरही राजकीय पक्ष आणि संघटनांना या मेळाव्याचे महत्त्व आणि आकर्षण निर्माण झाल्याने त्यांनीही आपापले मेळावे सुरु केले. त्यामुळे विजयादशमी अर्थातच दसऱ्या दिवशी महाराष्ट्रात जवळपास पाच ठिकाणी दसरा मेळावा पार पडतो. यात सर्वात उल्लेखनीय असतो तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा. त्यानंतर मंग पंकजा मुंडे, आरएसएस यांसारख्या काही व्यक्ती आणि संस्थांचा. कोल्हापूर येथे दसरचा चौकात पार पडणारा शाही मेळावा हासुद्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. दुसऱ्या बाजूला शिवसेना पक्षात बंड करुन बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे देखील आपल्या पक्षाचा मेळावा दसऱ्या निमित्त घेतात. या सर्व मेळाव्यांवर टाकलेला हा अल्पसा कटाक्ष.
शिवसेना (UBT) शिवतीर्थ आणि उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षात अभूतपूर्व फूट पडली आणि तिची दोन शकले झाली. त्यामुळे एकाच पक्षाचे (तांत्रिकदृष्ट्या भिन्न असलेल्या) दोन मेळावे पार पडताना महाराष्ट्राला पाहायला मिळाले. शिवसेना (UBT) पक्षाच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर अर्थातच शिवतीर्थ येथे मेळावा पार पडतो आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खास करुन राज्यातील बदलते राजकारण, एकनाथ शिंदे यांनी केलेली टीका आणि पक्षाची ध्येयधोरणे या मुद्द्यांवर ते काय भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेळावा पार पडाण्यासाठी मोठे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक ती जबाबादारी गटाचे राज्यातील संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील विभाग प्रमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
आझाद मैदान आणि एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकानथ शिंदे (Eknath Shinde) गाटाचा म्हणजेच त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचा मेळावा मुंबई शहरातील आझाद मैदान येथे पार पडत आहे. त्यांच्या गटानेही मेळाव्यासाठी जय्यत तयारी केली आहे. या मेळाव्यात तेही काय बोलतात, एखादी मोठी घोषणा करतात का, याकडे नागरिकांचे आणि खास करुन त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
सावरगाव आणि पंकजा मुंडे
भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी कायम ठेवली आहे. त्यात थोडासा बदल झाला आहे तो इतकाच की, सुरुवातीला भगवान गडावर पार पडणारा हा मेळावा आता सावरगाव येथे पाठिमागील काही वर्षांपासून पार पडतो आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावरुन राजकीय मेळाव्या सुरुवात केली. मात्र, त्यांच्या निधनानंतर गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी गडावर राजकीय संबोधनास विरोध केला. परिणामी पंकजा मुंडे यांची कोंडी झाली. त्यामुळे त्यांनी भगवान गडावरुन राजकीय भाषणे थांबवून सावरगाव घाट येथे मेळावा घेण्यास सुरुवात केली. पाठिमागील पाच-सहा वर्षांपासून सावरगाव येथे त्यांचा मेळावा पार पडतो आहे.
कोल्हापूरात शाही दसरा (Kolhapur Dasara)
कोल्हापूर येथे पार पडणारा शाही दसरा हा अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. देशामध्ये म्हैसुरचा दसरा प्रसिद्ध आहे. त्यानंतर जर कुठला दसरा प्रसिद्ध असेल तर तो आहे कोल्हापूरचा. राजर्षी शाहू महाराज यांनी सुरु केलेली दसरा चौकातील परंपरा आजही त्यांच्या वंशजांनी अखंडीतपणे सुरु ठेवली आहे.
विजयादशमी उत्सव
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी उत्सव साजरा होतो. संघाच्या परंपरेनुसार पथसंचालन आणि शस्त्रपूजन होते. त्यानंतर सरसंघचलक स्वयंसवेवकांना मार्गदर्शन करतात. पाठिमागील काही वर्षांपासून डॉ. मोहन भागवत सरसंघचालक पदावर आहेत. त्यामुळे यंदाही तेच स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.