Dangerous Buildings: नवी मुंबई महानगरपालिकेने जारी केली 2022-23 साठी धोकादायक इमारतींची यादी; 514 इमारतींचा समावेश
Buildings in Mumbai (Representational Image)

नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) 2022-23 साठी प्रभागनिहाय सर्वेक्षण केल्यानंतर शहरातील धोकादायक इमारतींची यादी जारी केली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 265 अन्वये एकूण 514 इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी महापालिकेने 475 इमारती धोकादायक श्रेणीत घोषित केल्या होत्या. दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर, नागरी संस्था धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते आणि नागरिकांना धोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आवाहन करते कारण त्या कधीही कोसळू शकतात आणि जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते.

यादीनुसार, एकूण 514 धोकादायक इमारतींपैकी 61 इमारती सी-1 श्रेणीत येतात, ज्या तातडीने पाडण्याची गरज आहे. गेल्या वर्षी 475 इमारतींपैकी 65 इमारती सी-1 श्रेणीतील किंवा उच्च जोखमीच्या होत्या. सी-1 श्रेणीतील इमारती उच्च-जोखीम श्रेणीतील, निर्जन अशा आहेत. यंदा सी-1 श्रेणीतील धोकादायक इमारतींची संख्या 4 ने घसरली आहे.

या व्यतिरिक्त, C-2A श्रेणी अंतर्गत 120 इमारती आहेत. परिसर रिकामा करून अशा संरचनांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, C-2B श्रेणी अंतर्गत येणाऱ्या 282 इमारती रिकाम्या न करता दुरुस्ती करता येऊ शकतील. उर्वरित 51 इमारती C-3 श्रेणीत येतात ज्यांना फक्त किरकोळ दुरुस्तीची गरज आहे.

धोकादायक घोषित केलेल्या इमारतींना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 264 अन्वये नोटीस पाठवण्यात आली आहे. धोकादायक इमारतींच्या मालकांना किंवा तिथे राहणाऱ्यांना या इमारतींचा निवासी किंवा व्यावसायिक कारणांसाठी वापर करणे थांबवण्याची सूचना करण्यात आली आहे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच C-1 श्रेणीतील इमारतीचे विद्युत व पाण्याचे कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचेही स्पष्टपणे नमूद केले आहे. (हेही वाचा: हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटीने बीएमसीकडे विकास कामांसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे मागवली)

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 265 (अ) नुसार, 30 वर्षांहून अधिक काळ वापरात असलेल्या इमारतींचे नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणीकृत बांधकाम अभियंता किंवा स्ट्रक्चरल अभियंता यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची जबाबदारी मालक किंवा रहिवाशांची आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नागरी संस्थेने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अभियंत्यांची यादी उपलब्ध करून दिली आहे.