Water Supply | (Photo credit: archived, edited, representative image)

सध्या देशासह राज्यात मोठया प्रमाणावर उष्मालहरीचा प्रभाव हा दिसून येत आहे. यासह देशात सध्या मोठ्याप्रमाणावर पाणी टंचाई ही निर्माण झाली आहे. देशातली ही परिस्थीती राज्यातही आहे. पुण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उपलब्ध पाणीसाठ्याची अवस्था खूपच बिकट झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील 26 पैकी एका धरणातील पाणीसाठा हा शुन्यावर पोहचला आहे. उजनीतील अचल पाणीसाठ्यानेही तळ गाठला आहे. उजनीतील अचल पाणीसाठाही 43 टक्क्यांनी कमी झाला आहे. (हेही वाचा - Marathwada Drought: मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ; 12 लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा)

आज घडीला जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून फक्त 27.83 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्ल्क राहिला आहे. एकूण पाणीसाठ्याचे हे प्रमाण अवघे 14.03 टक्के इतके आहे. सध्याचा उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा हे गेल्या वर्षीच्या तुलनेत 18.75 टीएमसी इतका कमी आहे. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला 46.58 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या आजच्या तारखेच्या उपलब्ध उपयुक्त पाणीसाठ्याचे हे प्रमाण 23.48 टक्के इतके होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा हा 9.45 टक्क्यांनी कमी झाला आहे.

पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण कोरडे पडले असून, उजनीतील उपयुक्त पाणीसाठा उणे 42.98 टक्के इतका आहे. आतापर्यंत उजनी धरणातील अचल (मृतसाठा) साठ्यातील 23.02 टीएमसी (42.98) टक्के पाणी वापरले आहे.  पुणे जिल्ह्यात टाटा उद्योग समूहाची सहा धरणे आहेत. त्यामध्ये मुळशी, ठोकळवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा आणि कुंडली यांचा समावेश आहे. या सहा धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता 42.76 टीएमसी इतकी आहे. यापैकी सध्या 15.65 टीएमसी (36.60 टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.