Marathwada Drought: मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ; 12 लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा
Drought (file image)

राज्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम आहे, तर दुसरीकडे मराठवाड्यात दुष्काळाची (Marathwada Drought) स्थिती असं चित्र निर्माण झाले आहे. मराठवाड्याला सध्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे (Water Supply By Tanker) लागत आहे.   मे महिन्याच्या सुरुवातीला 961 गावे आणि 345 वाड्यांना 1 हजार 424 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 12 लाख ग्रामस्थांना टँकरच्या पाण्याविना पर्याय नाही. मराठवाड्यात एप्रिल महिन्यात सुरू असलेल्या टँकरची संख्या वाढत गेली आहे.  राज्यात सुरु असलेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रश्न हा मागे पडलेला दिसत आहे. अनेक नेत्यांना या पाण्याच्या प्रश्नावरुन नेत्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकतो.  ( Severe Water Crisis: सोलापूर जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याचे गंभीर संकट; 15 दिवसांत एकदा टँकरने पाणीपुरवठा, प्रत्येक थेंबासाठी तळमळत आहेत लोक (Video))

जानेवारी महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 109 तर जालना जिल्ह्यात 76 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. फेब्रुवारी महिन्यामध्ये ही संख्या 319 वर पोहोचली होती. मार्च महिन्यात टँकरची संख्या 435 वर पोहोचली. तर एप्रिल महिन्यात मराठवाड्यात टँकरची संख्या 1424 वर पोहोचली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या 569 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर जालना जिल्ह्यात 418, परभणी जिल्ह्यात 5, नांदेड जिल्ह्यात 15, बीड जिल्ह्यात 302, लातूर जिल्ह्यात 13 तर धाराशिव जिल्ह्यात सध्या 102 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टॅंकरच्या किमती देखील वाढल्या असल्याचं दिसून येतं आहे. नागरिक हैराण झाल्याचं मराठवाड्याच चित्र आहे.