Aaditya Thackeray यांचा मोबाईल नंबर भासवत सायबर फ्रॉडद्वारा पैसे उकळण्याचा प्रयत्न; दादर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
Aaditya Thackeray | Pixabay.com and Instagram

दादर पोलिस स्टेशन (Dadar Police Station) मध्ये वरळी स्थित एका आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळलेल्या व्यक्तीला अनोळखी नंबर वरून आपण शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) असल्याच भासवत पैसे उकळण्याच्या प्रयत्ना विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अशाप्रकारच्या सायबर फ्रॉडच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

वरळी कोळीवाडा येथील 24 वर्षीय दिपेश जांभळे या कुस्तीपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये पदकं मिळवली आहेत. दरम्यान त्याचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या हस्ते सन्मान देखील झाला आहे. दिपेश हा युवासेनेचा देखील शिलेदार आहे.

तक्रारी मध्ये दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्टला दिपेशला एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला. हा नंबर त्याच्यासाठी अनोळखी होता. या नंबरवर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो डीपी म्हणून होता. आपण आदित्य ठाकरे असल्याचं भासवणार्‍या व्यक्तीने त्याला मेसेज करून आपल्याला मित्राला काही रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करायची आहे. मात्र नेट बॅंकिंग काम करत नसल्याने 25 हजार रूपये ट्रान्स्फर करण्याची विनंती केली. हा व्यवहार पेटीएम द्वारा करण्याचं आणि दुसर्‍या दिवशी पैसे परत दिले जातील असेही नमूद केले होते. हे देखील नक्की वाचा: Mumbai Crime: सावधान! पोलिस आयुक्तांचा फोटो वापरुन मेसेजद्वारे मुंबईकरांची फसवणूक .

दिपेशला हा प्रकार संशयास्पद वाटला त्याने युवासेनेचा पदाधिकारी सुरज चव्हाणला सारा प्रकार सांगितला. त्याने दादर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार या प्रकरणी कलम 417, 419, 511, 66 (C), 66 (D) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. सध्या पोलिस या मोबाईल क्रमांकावरून झालेले कॉल्स, इंटरनेट अ‍ॅक्टिव्हिटी द्वारा आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

आदित्य ठाकरे असल्याचं भासवल्यानंतर याच नंबरवरून DJ Akash Phaltan असल्याचं देखील भासवण्यात आलं आहे. डिजे आकाश सातार्‍याचा आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 1.71 लाख फॉलोवर्स आहेत. त्याने पोस्ट करून अशा प्रकारच्या फ्रॉड पासून दूर राहण्याचं आवाहन फॉलोवर्सना केलं आहे.